नगर परिषदेचा पुढाकार; संघाचे सहकार्य
पेण : प्रतिनिधी
पेणमध्ये कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता नागरिकांच्या थर्मल स्कॅनिंग तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून, यासाठी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.
पेण नगर परिषद हद्दीतील नागरिकांची तपासणी करण्याकरिता पालिकेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्याने ही थर्मल स्कॅनिंग मोहीम हाती घेतली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शहरातील नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. सर्व नागरिकांची थर्मल स्क्रिनिंग आणि ऑक्सिजन क्षमतेची तपासणी केली जात आहे. नगराध्यक्ष प्रीतम पाटील आणि आरएसएसचे स्वयंसेवक यात जातीने लक्ष देत आहेत.
एखाद्या व्यक्तीला लक्षणे आढळली अथवा संशयित रुग्ण वाटल्यास शहरात ठिकठिकाणी चार दिवसांसाठी डॉक्टर्स तैनात करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी रुग्णांची पुन्हा तपासणी करण्यात येत आहे. या मोहिमेला शहरातील नागरिकांनी सहकार्य करून तपासणी करून घ्यावी आणि आपले आरोग्य निरोगी ठेवून शहर कोरोनामुक्त करूया, असे आवाहन नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी केले आहे.