Breaking News

माथेरानच्या जंगलात रात्रीची गस्त

शिकार्‍यांना पकडण्यासाठी वन विभाग सतर्क

कर्जत : बातमीदार – माथेरानच्या जंगलात आणि डोंगरपट्ट्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात प्राण्यांची शिकार केली जात आहे. या पार्श्वभूमीवर वन विभाग सतर्क झाला असून, शिकार्‍यांना पकडण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून रात्रीची गस्त सुरू करण्यात आली आहे.

माथेरान येथील जंगल भागात प्राण्यांची शिकार केल्या जात असल्याबद्दल वृत्तपत्रात आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. याची दखल घेत रायगड वन विभागाकडून शिकार्‍यांना जेरबंद करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्हा उपवन अधिकारी यांच्या आदेशाने पनवेल येथील विभागीय वन अधिकारी एन. एन. कुकते यांनी जंगलात रात्रीची गस्त वाढविली आहे. वन विभागाच्या नेरळ, माथेरान वनक्षेत्र अधिकारी यांच्या अखत्यारीत सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना याकामी लावण्यात आले आहे. माथेरान वनपाल यांच्या कार्यक्षेत्रात असलेले वनपाल, वन रक्षक, वन मजूर यांच्याकडून रात्रीची गस्त घालण्यात येत आहे, तर नेरळ वनपाल, बेडीसगाव वनपाल क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी हे माथेरानच्या डोंगरपट्ट्यात गस्त घालत आहेत. याशिवाय नेरळ, माथेरान वन विभागाच्या मदतीला कर्जत तालुक्यातील वनरक्षकांना पाठविण्याचे नियोजन केलेले आहे.

वन कर्मचार्‍यांकडून माथेरानच्या जंगलात वावरत असलेल्या लोकांना थांबवून त्यांची चौकशी केली जात आहे, तर दुसरीकडे डोंगररांगेत देखील छुप्या पद्धतीने गस्त घालण्याचे काम केले जात आहे. त्यात संशयास्पद वावर असलेल्या लोकांवर वन विभागाने लक्ष केंद्रित केले आहे.

माथेरानचे जंगल हे संरक्षित वन असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी प्राण्यांचे मुक्त वास्तव्य राहिले पाहिजे. प्राण्यांची शिकार आम्ही सहन करणार नाही.

-एन. एन. कुकते, उपविभागीय वनाधिकारी

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply