Breaking News

श्रीवर्धन आगारातून लांब पल्ल्याच्या बस सुरू करण्याची मागणी

श्रीवर्धन : प्रतिनिधी – श्रीवर्धन परिवहन आगारातून 1 ऑगस्टपासून लांब पल्ल्याच्या सर्व बसफेर्‍या सुरू करण्यात याव्या, अशी मागणी प्रवासीवर्गामधून होऊ लागली आहे.

अनेक नागरिकांना उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. त्यामुळे लोक बसगाड्या केव्हा सुरू होतील याची वाट पाहत आहेत. श्रीवर्धन आगारातून दररोज मुंबई, बोरिवली, भाईंदर, नालासोपारा, ठाणे, कल्याण, भिवंडी, पुणे, लातूर, सातारा या मार्गावर जवळजवळ 45 ते 50 फेर्‍या चालू होत्या. सध्या त्या बंद आहेत.

 संपूर्ण देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने रायगडच्या विभाग नियंत्रकांनी श्रीवर्धन आगारातील बसफेर्‍या लवकरात लवकर चालू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे. एका आसनावर एकच प्रवासी या तत्वावर बस सुरू केली तरी नागरिकांना बरेच सोयीचे होईल. कारण प्रत्येक नागरिकाची आर्थिक परिस्थिती खासगी गाडी करून मोठ्या शहराकडे जाण्याएवढी नाही. साडेचार महिन्यापासून परिवहन महामंडळाचे कर्मचारीदेखील रिकामे बसलेले आहेत. केवळ परप्रांतीयांना सोडण्यासाठी पनवेलपर्यंत एसटी बस सोडण्यात आल्या होत्या. श्रीवर्धन-माणगाव एखाद-दुसरी बस सुरू आहे, परंतु माणगावला गेल्यानंतर सुद्धा रेल्वे वेळेवर मिळत नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

श्रीवर्धन तालुक्यात कोरोनाचे रुग्ण कमी आहेत त्यामुळे या आगारातून बस केव्हा सुरू होणार यासाठी परिवहन आगाराचे व्यवस्थापक जुनेदी यांच्याशी संपर्क साधला असता, अनेक वेळा फोनची रिंग वाजूनसुद्धा त्यांनी कॉल रिसिव्ह केला नाही. रायगड विभागाच्या विभाग नियंत्रकांनी श्रीवर्धन आगारातून बसफेर्‍या लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply