पोलादपूर पोलीस, ग्रामस्थ, आरोग्य कर्मचार्यांची मानवसेवा
पोलादपूर : प्रतिनिधी – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ येथे गेल्या महिनाभरापासून विमनस्क अवस्थेत फिरणार्या वृद्धाची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर पोलादपूर पोलीस आणि लोहारे ग्रामस्थांनी त्याला खासगी टेम्पोमधून ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले. कोरोना शब्द माहिती नसलेल्या या वृद्धाबाबत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांनी थोड्याशा कटूतेनंतरही अधिक उपचारासाठी त्यास माणगाव उपजिल्हा रूग्णालयामध्ये पाठविले आहे. पोलीस आणि आरोग्य यंत्रणेसोबत ग्रामस्थांची मानवसेवाही कौतुकास्पद ठरली.
कोरोनाच्या धास्तीने संपूर्ण जगभर आरोग्याची काळजी घेतली जात असताना कोरोना हा शब्दच माहिती नसलेला एक विमनस्क वृद्ध व्यक्ती लोहारमाळ येथे रस्त्याच्या कडेला वावरत असल्याचे दिसून येत होते, मात्र सोमवारी (दि. 27) सकाळी या वृद्धाची प्रकृती खालावल्याने पोलिसांच्या मदतीने ग्रामस्थांनी त्याला पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये एका टेम्पोने नेले.
ग्रामीण रुग्णालयामध्येही डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्यांना वृद्धाची किळसवाणी अवस्था पाहून अन्यत्र दाखल करण्याचा सल्ला देण्याची इच्छा झाली, मात्र काही वेळाने रुग्णालयाच्या ग्राऊंडवर वृद्धाच्या शरीरावरील किडे दूर करून महिला आरोग्य कर्मचारी महाडिक व पवार यांनी परिचारिका सुकदरे व कोळी यांच्या मदतीने निर्जंतुकीकरण केले आणि लोहारे येथील ग्रामस्थांनी केस व दाढी कापून त्याला आंघोळी घालून त्याला नवीन कपडेही नेसविले. यानंतर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयातील डॉ. वाघ आणि डॉ. सलागरे यांनी त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करून त्याची प्रकृती स्थिर केली तसेच त्याची श्वसनक्रिया सुरळीत होऊन अन्य वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी त्याला माणगाव उपजिल्हा रूग्णालयात रवाना करण्यात आले.
दरम्यान, या वृद्धाचे आडनाव सकपाळ असून, तो पोलादपूर तालुक्यातील आडावळे गावचा रहिवासी असून, अविवाहित असल्याची माहिती मिळाली आहे.