Breaking News

…तर प्रियंकांची गंगायात्रा पूर्ण झाली असती? ः गडकरी यांचा सवाल

नागपूर ः प्रतिनिधी

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी काही दिवसांपूर्वी गंगायात्रा करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टीकेचे लक्ष्य केले होते, मात्र प्रियंका गांधी यांची गंगायात्रा आम्ही जलमार्ग तयार केले नसते तर झाली असती का, असा सवाल नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी प्रियंका गांधी यांना केला आहे.

या वेळी नितीन गडकरी म्हणाले की, गंगायात्रेदरम्यान प्रियंका गांधी गंगेचे पाणी प्यायल्या. जर गंगा नदीची स्वच्छता आम्ही केली नसती तर गंगेचे पाणी पिता आलं असतं का? यूपीए सरकारच्या काळात तुम्ही हे काम केले नाही. ते काम आम्ही केले. मार्च 2020पर्यंत गंगा नदी पूर्णपणे स्वच्छ झालेली असेल, असा दावाही नितीन गडकरी यांनी या वेळी केला.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी 140 किमीची गंगायात्रा पूर्ण केली होती. या वेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील अनेक मतदारसंघांत भेट दिली. कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या दौर्‍यावरूनच प्रियंका गांधी यांच्यावर नितीन गडकरींनी टीका केली. गंगेत पुन्हा डॉल्फिन मासे दिसायला लागले आहेत, तर प्रयागराजच्या काठावर सायबेरियन पक्षीही पाहायला मिळाले. याशिवाय कासवांची संख्याही वाढली असल्याचा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

विरोधकांवरही साधला निशाणा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशातील सगळे विरोधी पक्ष स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. या पक्षांकडे कोणताही ठोस कार्यक्रम नाही. या विरोधी पक्षांच्या नेत्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे की नरेंद्र मोदी पंतप्रधान बनू नये. विरोधी पक्षांवर आलेल्या संकटामुळे ते सगळे एकत्र आले आहेत. विरोधी पक्षांकडे कोणताच मुद्दा नाही. त्यांच्याकडे नेते नाहीत. भाजपाने आपली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत, तसेच जगात देशाचा सन्मान वाढवला आहे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply