नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोना काळात आर्थिक कंबरडे मोडलेल्या कर्जदाराला केंद्र सरकारने दिलासा दिला असून, दिवाळीच्या आधी चांगली बातमी दिली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मोरॅटोरियम (कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचा अधिकार) काळातील व्याज रकमेवरील चक्रव्याढ व्याज रकमेत सूट देण्याचा आदेश दिला असून, यासंबंधीची नियमावली जाहीर केली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या या निर्णयाचा फायदा दोन कोटींपर्यंतचे कर्ज घेणार्या कर्जदारांना मिळणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या निर्णयाचा फायदा लघू, लघू व मध्यम, शैक्षणिक, गृह, क्रेडिट कार्ड, ऑटोमोबाइल, वैयक्तिक, व्यवसायिक कर्जदारांना होणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार 29 फेब्रुवारीपर्यंत कर्जदाराची थकबाकी दोन कोटींच्या पुढे असता कामा नये. माफ करण्यात आलेली चक्रव्याढ व्याज रक्कम संबंधित बँकांकडून खातेदारांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. ही रक्कम 5 नोव्हेंबरला किंवा त्याच्या आधी कर्जदाराच्या खात्यात जमा करावी लागणार आहे. यानंतर बँका 12 डिसेंबपर्यंत सरकारकडे परतफेडीसाठी दावा करू शकतात.