नागोठणे ः प्रतिनिधी
नागोठण्याचे सुपुत्र, अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल, माजी केंद्रीय गृहसचिव तथा महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव राम प्रधान (92) यांचे शुक्रवारी (दि. 31) अल्पशा आजाराने नरिमन पॉइंट, मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. कै. प्रधान यांचा मायभूमी या नात्याने नागोठणेशी कायम संबंध होता व आपल्या गावासाठी त्यांनी भरीव योगदानसुध्दा दिले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शहरात सर्वच स्तरावरून शोक व्यक्त करण्यात आला. त्यांच्या संपर्कात आलेल्या शहरातील अनेक व्यक्तींनी आपल्यातील एक आदर्शवत व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली.
याबाबत सीकेपी समाजाचे श्री रामेश्वर मंदिर, हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष गरुडे म्हणाले की, कै. प्रधान शंकरभक्त होते व शहरात आल्यावर ते मंदिराला आवर्जून भेट देऊन पूजाअर्चा करीत असत. समाजाच्या अख्यतारितील सर्व मंदिरांकडे त्यांचे कायम लक्ष असायचे. मुंबईच्या महालक्ष्मी ट्रस्ट तसेच स्वतःच्या वतीने मंदिरांच्या कामांसाठी त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांच्या निधनाने समाजात एक पोकळी निर्माण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कै. प्रधान नागोठण्याचे भूषण होते. नागोठण्यात आल्यावर समाजबांधवांशी ते आवर्जून वार्तालाप करीत असत. बोलण्याच्या ओघात ते लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत असत. त्यांच्या निधनाने समाज एका आदर्शवत व्यक्तिमत्त्वाला हरपल्याची भावना सीकेपी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शेखर भिसे आणि प्रदीप दुर्वे यांनी व्यक्त केली.