Breaking News

सेलिब्रेशन असावे ते ‘शोले’ पन्नाशीचे…

मिनर्व्हा चित्रपटगृह… दक्षिण मुंबईतील डॉ. भडकमकर मार्गावर (लॅमिन्टन रोड) किमान तीन पिढीतील चित्रपट रसिकांची अफाट गर्दी. ट्रॅफिक जाम झालाय. एकेक करत ‘शोले’तील कलाकार आपल्या प्रशस्त गाडीतून येताहेत. ते गाडीचा दरवाजा उघडण्यापूर्वीच जगभरातील मीडियाचे कॅमेरे आणि बूम त्यांच्यावर खिळलेत. प्रत्येकाला भावना अनावर झाल्या आहेत. फ्लॅशबॅकमध्ये जात त्यांना पन्नास वर्षांपूर्वीच्या आठवणीत जायचयं. अनेक प्रादेशिक भाषा व हिंदी, इंग्रजी वृत्तवाहिन्यांवर हे सगळेच उत्फूर्त कव्हरेज लाईव्ह दाखवताहेत. भरभरून टीआरपी मिळतोय. मिनर्व्हावर प्रचंड मोठी सजावट केली आहे. लेझर शो सुरू आहे. आकर्षक असे थिएटर डेकोरेशन आहे. गर्दीतील साठी-पासष्टी ओलांडलेल्या चित्रपट रसिकांना कॅमेर्यासमोर बोलते केले जात आहे. या उत्साहात आज हयात नसलेल्या संजीवकुमार, अमजद खान, ए. के. हनगल, लीला मिश्रा, विजू खोटे, मॅकमोहन, जगदीप अशांचा अजिबात विसर पडलेला नाही. मिनर्व्हाच्या भव्य दिमाखदार पडद्यावर सत्तर एमएम व स्टीरिओफोनिक साऊंड सिस्टीमचा दबदबा कायम आहे. पडद्यावर संवाद सुरू होण्यापूर्वीच पब्लिकमधून डायलॉगबाजी सुरू होतेय, कितने आदमी थे…
‘शोले’चे पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताचा सेलिब्रेशन हे असे झाले असते तर… आज मी मिनर्व्हावरून जातो तेव्हा त्याची ती 1499 अशी अफाट आसन क्षमता असलेली देखणी इमारत पूर्णपणे पाडलेली दिसते. अवतीभवती पत्रे लावलेत तरी मला यह दोस्ती हम नहीं तोडेंगे असा वीरू व जय यांच्या दोस्तीचा आनंद ऐकायला मिळतो… अब गोली खा, अशी गब्बरसिंगची दहशत तेथे जाणवते. यश, यश म्हणतात ते हेच असते.
सिप्पी फिल्मकडून म्हणा अथवा फिल्म हेरिटेज फाउंडेशनकडून म्हणा, ‘शोले’चे पन्नास वर्ष पूर्णतेचे जंगी सेलिब्रेशन याच मिनर्व्हा चित्रपटगृहात दणक्यात साजरे झाले असते. जगभरातून हिंदी चित्रपट रसिक त्यासाठी नक्कीच आले असते.
15 ऑगस्ट 1975 रोजी मुंबईत प्रदर्शित झालेला जी.पी. सिप्पी निर्मित व रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, बंगाल व हैदराबाद (निझाम) येथे शुक्रवार 22 ऑगस्ट 1975 रोजी आणि मग त्या काळातील पद्धतीनुसार टप्प्याटप्प्याने लहान मोठ्या शहरांपासून ग्रामीण भागातील चित्रपट रसिकांपर्यंत चित्रपट पोहचला. शोले न पाहणारा चित्रपट रसिक त्या काळात मिळणे महामुश्किल. शोले जणू या देशाची लोककथा झाला. पन्नास वर्ष पूर्ण निमित्ताने आता 15 ऑगस्ट 2025 रोजी आयनॉक्स मल्टीप्लेक्समध्ये पुन्हा अतिशय थाटात शोले प्रदर्शित होतोय. आता त्यात आणखी काही दृश्ये समाविष्ट केली आहेत. चित्रपट निर्मितीत काही दृश्य चित्रपटात समाविष्ट करता येत नाहीत (लांबीचा विचार करावा लागतो. कधी सेन्सॉर काही दृश्य कापते. अशी अनेक कारणे असतात. तो विषयच वेगळा) अशी अनेक दृश्य आता शोलेमध्ये पहायला मिळणार या गोष्टीचे आतापर्यंत हजार वेळा शोले पाहिलेला माणूस ही स्वागत्त करेल. पन्नास, शंभर वेळा शोले पाहणारे फिल्म दीवाने बरेच आहेत. ते आता आणखी अनेकदा शोले एन्जॉय करतील. आवडलेला चित्रपट पुन्हा पुन्हा एन्जॉय करणे हेदेखील एक चित्रपट रसिकांचे वैशिष्ट्य. शोलेसारखे चित्रपट ते अधोरेखित करतात.
शोले पन्नास वर्ष सेलिब्रेशला सुरुवात कुलाब्यातील रिगल चित्रपटगृहातील एका विशेष खेळाने झाली. काही महिन्यांपूर्वीचीच ही गोष्ट. पटकथाकार व संवाद लेखक सलिम जावेद यांच्यावरील माहितीपटाच्या निर्मितीच्या निमित्त शोलेचा हा खास खेळ फिल्म हेरिटेज फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला आणि शोच्या दोन अडीच तासापूर्वीच रिगलबाहेर शोले प्रेमींची लांबलचक रांग लागली. याच रांगेत मला संगीतकार कौशल्य इनामदार आपल्या मुलासह भेटले. आपण अनेकदा शोले अनुभवलाय. आज खास मुलाला दाखवायला घेऊन आलोय, ते मला भेटताक्षणीच म्हणाले. या खेळास सलिम जावेद यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. पडद्यावर सेन्सॉर प्रमाणपत्र दिसताच हाऊसफुल्ल गर्दीतील शोलेप्रेमीनी प्रचंड टाळ्या शिट्ट्यांनी रिगल डोक्यावर घेतले. कदाचित अतिशयोक्ती वाटेल, हा आवाज कदाचित गेट वे ऑफ इंडियातील फेरी बोटीत पोहचला असेल आणि मग प्रत्येक सुपर हिट डायलॉग पडद्यावर येण्यापूर्वीच पब्लिकमधून तोच डायलॉग बोलायला सुरुवात. बहुत याराना लगता है असो वा इसलिये के लोहा लोहे को काटता है असो, पब्लिक अगोदरच बोलू लागला.
काय भन्नाट अनुभव हो. असं वाटलं, पन्नास वर्षांपूर्वीचेच ते मिनर्व्हातील दिवस. पब्लिकचा तसाच जोश, तेवढाच उत्फूर्त जल्लोष. महान कलाकृती कायमच महान असते. सुपर हिट पिक्चर कायमच सुपर हिट असते. भले मग, शोलेमध्ये पाहण्यासारखे काय आहे असा वर्षानुवर्ष तिरसट प्रश्न करणारे असोत. आपल्याकडील चित्रपट रसिकांनी एकादा मसालेदार मनोरंजक चित्रपट डोक्यात व डोक्यावर घेतला की त्याला कोणीच खाली उतरून देऊ शकत नाहीत. यह पब्लिक है. त्यांची आवडनिवड जास्त महत्त्वाची.
शोले सेलिब्रेशन जत्रेत मग इटलीतील त्याचा प्रीमियर गाजला. तिकडेही हाऊसफुल्ल गर्दी. तोच थरार, तशीच रोमांचकता. मोठ्या पडद्यावर स्क्रीनिंग. आणि सोशल मिडियातून त्याच्या कव्हरेजला भरभरुन लाईक्स. सकारात्मक कॉमेन्टस. पन्नास वर्ष पूर्णतेबद्दल असा मुंबईत असा प्रीमियर का नाही असाही एक प्रश्न आहेच, पण आजच्या ग्लोबल युगात युरोपमधील प्रीमियर हा सर्वव्यापी ठरावा. आज जगभरातील अनेक देशांत आपले चित्रपट प्रदर्शित होताहेत. त्यानुसार विदेशात शोले पन्नास वर्ष पूर्णतेचा बहुचर्चित प्रीमियर.
मुंबईत शोले सेलिब्रेशनचा एक अनोखा फंडा पहायला मिळाला. नरिमन पॉईंट येथील एनसीपीए या भव्य दिमाखदार सभागृहात पडद्यावर शोलेची काही दृश्य व गाण्यांचा काही भाग (पण आवाज नाही) आणि समोरच शंभर वादकांचा आधुनिक वाद्यांसह ताफा आणि त्यांचे शोलेचे संगीत व पार्श्वसंगीत. एक भन्नाट अनुभव. भरपूर मेहनत घेऊन या सगळ्याचे आयोजन. खर्चिक गोष्ट, पण शोलेची शान त्यात दिसली. यूट्यूबवर हे सगळेच पहायला मिळतेय. एखाद्या चित्रपटाची अशीही दखल घेतली जाऊ शकते. शोलेतील गाणी मात्र त्या काळात चित्रपट सुपर हिट ठरल्यावर लोकप्रिय झाली. 1975 साली संगीतकार राहुल देव बर्मनचे गुलजार दिग्दर्शित आंधी व किनारा, रवि टंडन दिग्दर्शित खेल खेल मे या चित्रपटांचे संगीत जास्त लोकप्रिय होते. विशेषतः आंधीची गाणी आजही तेवढीच श्रवणीय.
आता तर शोलेतील नाणे! चित्रपटाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक विशेष उल्लेखनीय आठवण म्हणून असे नाणे प्रकाशित करणे ही कल्पनाच भन्नाट. चित्रपटात हे नाणे जणू एक व्यक्तिमत्व आहे. जय व वीरू यांच्या नात्यातील महत्त्वाची गोष्ट. मला आठवतंय मिनर्व्हात शोले अनुभवताना नाणेफेकीच्या प्रसंगात हे नाणे जणू आपल्या आसपास पडलयं असा जबरदस्त फिल येई. स्टीरिओफोनिक साऊंड सिस्टीम म्हणजे काय याचा तो अनुभव आणि याच नाण्यावरुन अनेक किस्से, गोष्टी, कथा, दंतकथा. त्यात त्या नाण्याच्या दोन्ही बाजू एकच हा ट्विस्ट गाजलेला.
शोलेच्या पन्नास वर्ष पूर्णतेच्या सेलिब्रेशनच्या अशा एकेका गोष्टी या लोकप्रिय कलाकृतीचा प्रभाव अधोरेखित करताहेत. या गोष्टी चित्रपट रसिकांचा उत्साह वाजवताहेत.
सध्या चित्रपटाच्या जगात विशेष काय चाललयं, या प्रश्नावर मी त्याच तत्परतेने उत्तर देतो, शोलेचे पन्नास वर्ष पूर्णतेचे सेलिब्रेशन सुरू आहे, आजही, उद्याही व केव्हाही असे म्हणतो. शोलेसह सामाजिक सांस्कृतिक माध्यम क्षेत्रांचाही पन्नास वर्षांचा बदलता प्रवास सुरू आहे. तोदेखील उल्लेखनीय. शोले म्हणजे न संपणारी कथा,
पटकथा व संवाद. यशाच्या गोष्टी कायमच कौतुकाच्या असतात. शोलेची तशीच तर आहे…

  • दिलीप ठाकूर (चित्रपट समिक्षक)

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply