आणखी सहा जण ताब्यात; एक अल्पवयीन
रोहा : प्रतिनिधी
रोह्यातील तांबडी येथील बलात्कार व हत्या प्रकरणात आणखी सहा नराधमांना रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शनिवारी (दि. 1) ताब्यात घेतले. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्यामुळे तांबडीतील 14 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे.
तांबडी येथील अल्पवयीन मुलगी 26 जुलै रोजी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास दुचाकी घेऊन तिच्या आजोबांकडे ताम्हणशेत येथील शेतावर निघाली होती, मात्र रात्रीचे आठ वाजले तरी न परतल्याने तिच्या आई-वडिलांसह ग्रामस्थांनी शोध घेतला असता, ताम्हणशेत बुद्रुक गावच्या रस्त्यावरील ओहळाच्या मध्यभागी एका दगडावर तिचा विवस्त्रावस्थेतील मृतदेह आढळून आला होता. तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर संपूर्ण रायगडातून तीव्र संताप व्यक्त करीत आरोपींना कडक शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणी दुसर्या दिवशी रोहा पोलीस ठाण्यात हत्या व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्यामध्ये 12 तासांच्या आत एकाला ताब्यात घेण्यात आले, मात्र घटनेच्या सुरुवातीपासून पीडित मुलीचे नातेवाईक, ग्रामस्थ यांनी या प्रकरणात एकापेक्षा अधिक जणांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने तपास सुरू होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे हे प्रकरण सोपविण्यात आले. अटक केलेल्या तरुणाने चौकशीत गुन्ह्यामध्ये इतर काही जणांचा सहभाग असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार तांबडी गाव परिसरातील आणखी सहा नराधमांना स्थानिक गुन्हे अन्वेषण ताब्यात घेतले असून, यापैकी एक जण अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी यापूर्वी अटक करण्यात आलेल्या तरुणासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
दरम्यान, या गुन्ह्याचा पुढील तपास करण्यासाठी विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेऊन पाच सज्ञान नराधमांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जमील शेख अधिक तपास करीत आहेत.