Breaking News

विधायक विरोध

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे महाराष्ट्राविषयीचे व्हिजन एका खाजगी वाहिनीवर बोलताना मांडले. महाराष्ट्रातील प्रश्नांविषयी, प्रगतीविषयी, कोरोना महामारीच्या सद्यस्थितीविषयी जी सुस्पष्टता आहे, ती खचितच राज्यातील तीन चाकी महाआघाडीच्या कारभारात दिसते.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार ज्या सक्षमतेने सांभाळला तशीच उत्तम कामगिरी ते विरोधी पक्षनेते म्हणून करीत आहेत याविषयी कुणाचेही दुमत असणार नाही. खरे तर त्यांच्याकडून राज्यातील तीन चाकी सरकारला सातत्याने वेगवेगळ्या मुद्द्यांवर जाब विचारला जात असल्यानेच की काय हे गोंधळलेले सरकार थोडीफार तरी हालचाल करताना दिसते असे म्हटले तर वावगे ठरू नये. फडणवीस यांचा कामाचा झपाटा, प्रश्न उत्तमरीतीने समजून घेऊन वेगाने त्यावर कार्यवाही करण्याची त्यांची कार्यशैली आणि महाराष्ट्राविषयीचे त्यांचे सुस्पष्ट असे व्हिजन यांची उणीव कोरोना महामारीसारख्या भीषण संकटाच्या काळात राज्यात निश्चितपणे जाणवते आहे. जनमानसाचा कानोसा घेतला तर हीच भावना व्यापकपणे व्यक्त होताना दिसेल. कोरोनाचे महासंकट राज्यावर येऊन कोसळल्यापासून फडणवीसांनी कधीही उसंत घेतलेली नाही. परिस्थितीचा सतत आढावा घेत राहणे व जिथे-जिथे म्हणून काही उणीवा असतील त्या सरकारच्या लागलीच लक्षात आणून देऊन त्या दूर करण्यास सरकारला भाग पाडण्याचे विरोधीपक्ष नेत्याचे कर्तव्य व जबाबदारी ते अतिशय दमदारपणे पार पाडीत आहेत. आणि हे सारे करताना, त्यांचा बाज निव्वळ सरकार टीका करण्याचा कदापिही नसतो. संपूर्ण माहितीनिशी ते परिस्थितीचे वा प्रश्नाचे नेमके स्वरुप समोर ठेवतात. पातळी सोडून केलेली टीका त्यामुळे त्यांच्याकडून कधीही होताना दिसत नाही. तर दिसतो तो निव्वळ विधायक विरोध. खरे तर त्याला विरोधही का म्हणावे? सरकारला वेळोवेळी पत्रे पाठवून, त्यांचे कुठे चुकते आहे ते दाखवून देऊन, नेमके काय केले गेले पाहिजे हे सांगून फडणवीस या गोंधळलेल्या सरकारला मदतच करीत आहेत असे म्हटले तरी वावगे ठरू नये. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री इतक्या भीषण संकट काळात घरी बसून असल्याची चर्चा होते. त्याचवेळेस विरोधीपक्ष नेता मात्र राज्यभर फिरून जनतेला धीर देण्याचे काम करतो याला काय म्हणावे? राज्यातील जनतेने भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागांवर निवडून दिले. जनतेचा कौल स्पष्ट असताना देखील पक्षाला विरोधी पक्षाची जबाबदारी स्वीकारावी लागली. पण जे कारस्थाने करून सत्तास्थानी बसले, त्यांच्या कामाची गती पाहिली की जनतेलाही विरोधीपक्ष नेत्याच्या रूपात फडणवीस यांच्याकडून दिसणारी कामाची धडाडी ध्यानात येतच असेल. शुक्रवारी एका खाजगी वृत्तवाहिनीवर आपले महाराष्ट्राविषयीचे व्हिजन मांडताना फडणवीस असे म्हणाले की आपले मुख्यमंत्री पदी असताना महाराष्ट्रासाठीचे जे व्हिजन होते, त्यात आताही तसुभरही बदल झालेला नाही. कारण महाराष्ट्र तोच आहे, महाराष्ट्राच्या प्रगतीची स्वप्नेही तीच आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका बदलली असली तरी त्यांचे महाराष्ट्रासाठीचे व्हिजन तसेच कायम आहे. सक्षम विरोधीपक्ष हा यशस्वी लोकशाही सरकारसाठी एक अत्यावश्यक व पूरक घटक मानला जातो. फडणवीस यांच्या रूपाने एका अतिशय सक्षम अशा विरोधीपक्ष नेत्याचे दर्शन घडते आहे हे सारेच निर्विवादपणे मान्य करतील.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply