Breaking News

कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा चारशेपार; 150 पोलीस कोरोनामुक्त

पनवेल : बातमीदार

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 405 पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच वेळी त्यांच्या 225 त्यांच्या नातेवाइकांनाही लागण झाल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, बाधित पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या कोरोना अलगीकरण आणि विलगीकरण केंद्रात रुग्णांना सामावून घेण्याची क्षमता संपत आल्याने नव्याने आढळलेल्या बाधितांना अन्यत्र दाखल केले जात आहे.

दिघा ते उरण असा मोठा विस्तार असलेल्या नवी मुंबई पोलिसांच्या हद्दीत सध्या साडेचार हजार पोलिसांचे मनुष्यबळ आहे. त्यात विविध रजा, साप्ताहिक सुटी, याशिवाय न्यायालय आणि वैद्यकीय तपासणीसाठी कैद्यांची जबाबदारी असलेल्या रोज किमान 200 पोलीस कर्मचारी कामात व्यग्र असतात. यात कार्यालयीन कामकाजासाठी एक हजारच्या आसपास कर्मचारी व्यग्र असतात. याशिवाय गुन्हा करून पळून गेलेल्या आरोपीचा माग काढण्यासाठी राज्याबाहेरील भागांत पोलिसांना जावे लागते. अशा वेळी शहरातील कायदा सुव्यवस्था राखणार्‍या पोलिसांची संख्या दोन हजारांच्या आसपास असते. त्यात आता चारशेहून अधिक पोलिसांना लागण झाल्याने मनुष्यबळ कमी पडत आहे.

आजवर 150 पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. ते कामावर रुजूही झाले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी राज्यात प्रथम बाधित पोलिसांसाठी नेरुळ येथील ‘सावली’ संस्थेच्या इमारतीत अलगीकरण आणि विलगीकरण केंद्र उभारले. या ठिकाणी 50 पोलिसांवर उपचार करण्यासाठी सोय आहे. मात्र, बाधितांची संख्येत वाढ झाल्याने केंद्रात खाटा अपुर्‍या पडत आहेत.

आजवरची स्थिती

अधिकारी :   55

पोलीस कर्मचारी :   350

एकूण :     405

नातेवाइक :   225

पोलीस मृत्यू :    01

नातेवाइक मृत्यू : 02

कोरोनाबाधित पोलिसांची संख्या चारशेवर आहे. अर्थात हे कर्मचारी कामावर असताना बाधित झाले आहेत. मात्र, संसर्ग झाल्यानंतर योग्य वेळी निदान आणि योग्य उपचारांमुळे कोरोनामुक्त झालेल्या पोलिसांची संख्याही जास्त आहे.

-सुरेश मेंगडे, पोलीस उपायुक्त विशेष शाखा

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply