खोपोली : प्रतिनिधी
शिवजयंती उत्सवानिमित्त खोपोलीतील शिवप्रेरणा मित्र मंडळ- काटरंग आणि मोगलवाडी ग्रामस्थ यांच्या तर्फे रविवारी (दि. 24) प्रख्यात कीर्तनकार व समाजप्रबोधक इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री नऊ वाजता सुरु झालेले कीर्तन रंगांत आले असतांना, रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी खोपोली पोलीस तेथे आले व त्यांनी आवाज बंद करण्याचे फर्मान साउंड सिस्टीम आयोजकाला सोडले. तसेच फर्मान पाळले नाही, तर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असेही सुनावले. त्यानुसार आवाज बंद झाला व गोंधळ निर्माण झाल्याने इंदोरीकर महाराज यांना नाईलाजाने कीर्तन थांबवावे लागले. पोलिसांच्या या कारवाईने आयोजक व उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त करीत निषेध व्यक्त केला. पोलिसांनी साउंड सिस्टीमचा आवाज बंद केल्यावर आहे त्या परिस्थितीत इंदोरीकर महाराज यांनी कीर्तन सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र जमलेल्या सुमारे 50 हजार नागरिकांपर्यत आवाज जात नसल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. उपस्थित नागरिक आवाज आवाज असे ओरळू लागले व गोधळाची स्थिती निर्माण झाली . दरम्यान उत्सव कमिटी, कीर्तन आयोजक व उपस्थित स्थानिक नेत्यांनी एक तास साउंड सिस्टीमचा आवाज लोकांना ऐकू जाईल एवढा तरी सुरू ठेवा अशी विनंती पोलिसांना केली. मात्र सुप्रीम कोर्टाचा नियम व आचारसंहितेचा हावाला देत पोलिसांनी आपली कायद्याची भूमिका ताठर ठेवली व कायद्याचे उल्लंघन झाल्यास आयोजक व साउंड सिस्टीम मालकावर कडक कारवाई करण्याची नोटीसही बजावून टाकली. दरम्यान उपस्थित नागरिकांत संताप वाढून स्थिती हाताबाहेर जाऊ लागली होती. अखेर कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी 10.30 वाजता, आहे त्या स्थितीत कीर्तन थांबवले. या प्रकाराने काही काळ तणावाची स्थितीही निर्माण झाली होती.