Breaking News

जागतिक महिला दिनानिमित्त पनवेलमध्ये नारीशक्तीचा सन्मान

प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान : लोकनेते रामशेठ

पनवेल : रामप्रहर वृत्त
प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्याचा झेंडा रोवला आहे. स्वतःच्या घरापासून ते देशाच्या विकासापर्यंत महिलांचे मोठे योगदान आहे, असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी (दि. 8) येथे काढले. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित सन्मान सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून ते बोलत होते.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल मीडिया प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 70 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात वैद्यकीय, वकील, नाट्य-सिने, राजकीय, स्वच्छतादूत, नर्स, समाजसेवा, साहित्य, शिक्षक, एसटी वाहक, रिक्षाचालक, पिग्मी एजंट आदी क्षेत्रातील महिलांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
पनवेलमधील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येेष्ठ पत्रकार व साहित्यिक निला उपाध्ये, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आदिती सारंगधर, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे आदी उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना पुढे सांगितले की, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, राजकारण, औद्योगिक अशा विविध क्षेत्रांत महिलांची कामगिरी उंचावत आहे. ही जबाबदारी बजावताना त्यांनी कुटुंबाची जबाबदारी झटकली नाही. त्यामुळे समाजाच्या उद्धारासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या क्रांतिसूर्य सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांचा वारसा जपण्याचे काम होत आहे.
आज कुठल्याही क्षेत्रात पाहिले तर महिला अग्रस्थानी आहेत. कुटुंबाला आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्या रणरागिणीही होतात. त्यामुळे महिलांनी मागे राहण्याची गरज नाही, तर पुढे आले पाहिजे. या वेळी त्यांनी सत्कारमूर्ती ब्रह्मकुमारी तारादीदी यांचा उल्लेख करीत दीदी दरवर्षी मला आवर्जून राखी बांधत आशीर्वाद देत असून, त्यांचे मला मार्गदर्शनही लाभते, अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त करून महिलांप्रती असलेला आदर व्यक्त केला, तसेच सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सुप्रसिद्ध अभिनेत्री आदिती सारंगधर यांनी म्हटले की, महिलांमध्ये मुळातच जीवनाचे गांभिर्य जास्त असते. त्यामुळे त्यांच्याकडे असलेली ताकद ही समाजाला ऊर्जा देणारी आहे. महिलांना नेहमीच कुटुंबाची काळजी असते, पण त्यांनी स्वतःचीही काळजी घेतली पाहिजे, स्वतः सक्षम झाले पाहिजे आणि प्रत्येक महिलेने स्वतःसाठी आधी जगायला शिकले पाहिजे, तरच आयुष्याची भूमिका यशस्वी होण्यास मदत होईल.
सावित्रीबाईंनी शिक्षणाचा पाया रोवला. त्यामुळे आपण सुशिक्षित झालो. महिलांच्या मुठीत ताकद आहे. त्यांनी समाजात वावरताना अधिकाराने आणि जागरूकतेने वावरले पाहिजे, तसेच पुरुषप्रधान मानसिकता बदलण्याची गरज आहे व म्हणूनच महिला दिन साजरा करण्याची गरज आहे, असे ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये यांनी नमूद करून म्हटले की, लोकनेते रामशेठ ठाकूर सज्जन व्यक्तिमत्व असल्याने ते सर्व समाज आणि महिलांच्या पाठीशी सदैव ताकदीने उभे राहतात. त्यांच्या कार्याचे कौतुक आणि आभार मानू तेवढे कमी आहेत.
या वेळी कवयित्री ज्योत्स्ना रजपूत यांनी ’मुली’ या शीर्षकाखाली कविता सादर करून वातावरण निर्मिती केली. या सोहळ्याचे प्रास्ताविक पनवेल मीडिया प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार गणेश कोळी यांनी केले.
या आहेत सत्कारमूर्ती
पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, डॉ. अरुणा पोफरे, सिने-नाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, पनवेल मनपालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, अ‍ॅड. शुभांगी झेमसे, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, विद्या गायकवाड, डॉ. सुरेखा मोहोकर, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, ब्रम्हकुमारी तारादीदी, सुनिता जोशी, बिना गोगरी, माजी नगरसेविका नीता माळी, डॉ. जयश्री पाटील, वाहतूक पोलीस साधना पवार, विजया कदम, मोनिका वानखेडे, स्वप्नाली म्हात्रे, अश्विनी बाविस्कर, श्वेता भोईर, सुरेखा राणे, केशर पाटील, मालती म्हात्रे, रंजना माने, वनिता माने, शालिनी गुरव, ललिता राऊत, डॉ. समिधा गांधी, पद्मावती गायकवाड, मीनल साळवी, शमीम चौधरी, अनघा तांबोळी, ज्योती वाहुळकर, शैला आंबेकर, सुनिता शिंदे, प्रभावती गायकवाड, बबिता बैद, छाया चित्रे, ज्योत्स्ना रजपूत, सुनिता रामचंद्र, डॉ. रेहना मुजावर, डॉ. मनीषा चांडक, संगीता पाटील, सुप्रिया दिघोडकर, सायली काटकर, सुरेखा पानधरे, गीता कुळकुळे, सुप्रिया परब, डॉ. पद्मिनी येवले, दक्षता पाटील, सुप्रिया वराडकर, तेजस्विनी नाईक, स्वराली मांजरेकर, सविता पिल्ले, सारिका मानकामे, मेघना कदम, भारती पवार, डॉ. दिपाली माने, संगीता नितीन जोशी, योगिनी वैदू, ज्योती भोपी, मनीषा सावंत, प्रतिभा मंडले, प्रा. जयश्री शिर्के, सविता वाघमारे, सुनिता पनवेलकर, कल्पना कोनकर, वनिता गुडे, उमा देसाई, स्नेहल माळी.

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी माझ्यावर विश्वास दाखविला, त्यामुळेच मी महापौर झाले. यापूर्वी आपल्याला राजकीय क्षेत्राचे काहीच ज्ञान नव्हते. कुठलेही क्षेत्र असो त्यात बेस्ट करायचे मनाशी ठरवले. म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना विकासकामे कशी करतात याची शिकवण मिळाली.
-महापौर डॉ. कविता चौतमोल, सत्कारमूर्ती

अन्याय होऊ नये यासाठी जागरूक रहा : सायली म्हात्रे
उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांनी आपल्या तडाखेबाज भाषणात राज्यातील महिला-मुलींवरील अत्याचाराकडे लक्ष वेधले. महिला सक्षम करण्याचे काम होत असताना राज्य सरकारमधील मंत्री मात्र बलात्कार आणि आत्महत्या करण्यास महिलांना प्रवृत्त करीत आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात दोषी नराधमाला शिक्षा होण्याऐवजी गृहखाते शांत बसले आहे. अशा घटना घडल्या तर महिला कशा सक्षम होतील असा सवाल करून म्हात्रे म्हणाल्या की, महिलांच्या बाजूने खंबीरपणे उभ्या राहून चित्रा वाघ अन्यायाविरोधात लढत असताना त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम पोलीस करीत आहेत, तर दुसरीकडे बलात्कार, आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍या नराधमांना मोकाट सोडले जात आहे. हा कुठला न्याय? या वेळी त्यांनी राज्य सरकारच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला, तसेच कुठलाही प्रसंग येऊ द्या, परंतु आत्महत्या करू नका. अन्याय होऊ नये यासाठी जागरूक रहा, असे आवाहनही महिलांना केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply