नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या मागणीला यश
पनवेल : बातमीदार – पनवेल महानगरपालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढीस लागलेली आहे. प्रशासनाकडून या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दररोज शंभरपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळे पनवेल कोळीवाडा येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णांकरता रुग्णालय सुरू करण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले असून महापालिकेने काही प्रमाणात गर्भवती मातांसाठी आरोग्य व्यवस्था सुरू केली आहे.
पनवेल व आजूबाजूच्या परिसरातील नॉन कोविड रुग्णांना कोविडची चाचणी केल्याशिवाय उपचार केले जात नसल्याने त्यांना उपचार घेणे खूप अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत जर नॉन कोविड रुग्णांकरिता हॉस्पिटल सुरू केले तर अनेक नागरिकांना होणारा त्रास कमी होईल व त्यांना इतर रोगांवरही व्यवस्थित रित्या उपचार घेणे शक्य होईल, असे मत डॉक्टर अरुणकुमार भगत यांनी व्यक्त केले होते आणि याबाबतचे निवेदन त्यांनी पनवेल पालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिले होते.
त्यानुसार कोळीवाडा (उरण नाका) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीमध्ये 20 खाटांचे नॉन कोविड गर्भवती माता प्रसूती केंद्र सुरू करण्यात आले आहे.