Breaking News

बेशिस्त वाहनचालकांना दणका; सात महिन्यांत कोट्यवधींचा दंड वसूल; लाखो जणांवर कारवाई

अलिबाग ः प्रतिनिधी

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत एक लाख 15 हजार 601 वाहनचालकांवर कारवाई करीत दोन कोटी 89 लाख 99 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये लायसन्स नसलेल्या वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.

बेशिस्तपणे वाहन चालविणार्‍या वाहनचालकांना शिस्त लागावी तसेच मद्यप्राशन करून गाडी चालविण्याचे प्रमाण घटविण्यासाठी जिल्हा वाहतूक पोलिसांनी सध्या विविध उपक्रम हाती घेतले आहेत, तर शाळांच्या परिसरात फिरणार्‍यांना पोलिसांनी आवर घालण्याचा प्रयत्न केला असून, शहरातील मुलींच्या शाळा, बसस्थानक परिसरात पथके कार्यान्वित करून कारवाई तीव्र केली आहे. शाळेच्या वेळेत किंवा शहरातून सुसाट वेगाने धावणार्‍या धूम स्टाइल बाइकर्सविरोधातही मोहीम उघडण्यात आली असून, त्यांना अडवून कागदपत्रे, वाहन चालविण्याचा परवाना आदी तपासणी केली जात आहे. त्यातील अनेकांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई केली आहे, तसेच दररोज 10 ते 15 वाहनधारकांना दंड केला जात आहे.

जिल्ह्यात जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या सात हजार 140 जणांवर, अनधिकृत नंबर प्लेट वापरणार्‍या 207, ओव्हर लोडिंग वाहतूक करणार्‍या, अतिवेगाने गाडी चालविणार्‍या, धोकादायक ओव्हरटेक करणार्‍या 417 जणांवर, जादा प्रवासी वाहतूक करणार्‍या 474 जणांवर, लेन कटिंग करणार्‍या, सीटबेल्ट न लावणार्‍या एक हजार 319 जणांवर, टेल लाइट 71 जणांवर, मोबाइलवर बोलत गाडी चालविणार्‍या 247 जणांवर, नो पार्किंगमध्ये गाडी पार्क करणार्‍या 376 जणांवर, इन्शुरन्स न वापरणार्‍या 350, हेल्मेट न वापरणार्‍या 79 जणांवर, काळ्या काचा वापरणार्‍या, तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणार्‍या अशा एकूण एक लाख 15 हजार 601 वाहनचालकांवर कारवाई करीत दोन कोटी 89 लाख 99 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

विशेष मोहीम सुरू

धोकादायक वळणावर स्टंट करताना अनेक तरुण दिसतात. याबाबतच्या तक्रारी पोलिसांपर्यंतही आल्या आहेत. त्यामुळे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी वाहतूक विभागाचा चार्ज हाती घेतल्यावर

वाहनचालकांना शिस्त लागावी म्हणून विशेष मोहीम राबविली. वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचार्‍यांनी ही मोहीम सुरू केल्यानंतर धूम स्टाइलने बाइक चालविणार्‍यांवर जरब बसली आहे. मागील दोन महिन्यांपासून अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply