Breaking News

पनवेलमध्ये तीन नवे रुग्ण

मुंबईतून होतोय प्रादुर्भाव

पनवेल ः रामप्रहर वृत्त  
पनवेल महापालिका क्षेत्रात खांदा कॉलनीतील महिला वैद्यकीय अधिकारी व नवीन पनवेल येथील सफाई कामगाराचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने महापालिका क्षेत्रात शुक्रवारी (दि. 24) दोन रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे 44 पॉझिटिव्ह रुग्ण झालेत. पनवेल तालुक्यात एक रुग्ण वाढला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या 52, तर रायगडमध्ये 64 झाली आहे. महापालिका क्षेत्रातील बहतांश रुग्ण हे मुंबईत अत्यावश्यक सेवेत काम करणारे असल्याचे दिसून येत आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील नवीन पनवेल सेक्टर 13मधील 51 वर्षीय व्यक्ती मुंबई महापालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होती. खांदा कॉलनीतील महिला डॉक्टर मुंबईच्या मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये वैद्यकीय अधिकारी आहे. या दोन्ही रुग्णांना ते काम करीत असलेल्या कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा अंदाज आहे. पनवेल महापालिका हद्दीतील 589 जणांची टेस्ट केली. त्यापैकी 500 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 45 जणांचे रिपोर्ट अद्याप मिळाले नाहीत. कोरोना पॉझिटिव्हपैकी खारघर दोन, कामोठे तीन व कळंबोलीतील 10 असे 15 जण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले, तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पनवेलमधील भिंगारवाडी येथील 61 वर्षीय व्यक्तीने खांदा कॉलनीतील अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले होते. त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्या संपर्कातील आणखी तिघांची टेस्ट निगेटिव्ह आली. त्यामुळे पनवेल तालुक्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 52 झाली. तालुक्यातील आठपैकी पाच रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी दत्ता नवले यांनी दिली. पनवेल महापालिका क्षेत्रात पूर्वी सापडलेले पॉझिटिव्ह रुग्ण सुरुवातीला परदेश प्रवासाचा इतिहास असलेले किंवा त्यांच्याशी संबंधित होते, पण आता सापडत असलेले रुग्ण मुख्यतः मुंबईत अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले आहेत.

Check Also

पेणमध्ये भाजपचा बूथ मेळावा उत्साहात

पेण ः रामप्रहर वृत्त रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.14) पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचे …

Leave a Reply