रेवदंडा ः प्रतिनिधी
वळके पंचक्रोशीतील सात गावांतील ग्राम कोरोना कमिटी, ग्रामपंचायत कमिटी, गाव अध्यक्ष व प्रत्येक गावातील मार्गदर्शक व्यक्ती, युवक प्रतिनिधींची रविवारी (दि. 2) बैठक झाली. विशेष समन्वय समितीच्या सभेत वळके पंचक्रोशीत फक्त पाच दिवसांचे गणपती व गोविंदा उत्सवही साधेपणाने करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत वळके ग्रामपंचायतीच्या वतीने किशोर काजारे यांनी प्रसिध्दिपत्रकाव्दारे आवाहन केले आहे. जिल्हाधिकार्यांचे परिपत्रक तथा कोरोना आदेश क्र. 407/2020नुसार वळके पंचक्रोशीत कृष्णाष्टमी व गणेशोत्सवाबाबत कोविडच्या पार्श्वभूमीवर आयोजनात बदल करण्यात येऊन नियमावली जाहीर करण्यात आली.
श्रीकृष्ण जन्माष्टमीत रात्रीचे कार्यक्रम रद्द करावे. दहीहंडी उंच दोरावर किंवा काठीवर न टांगता फक्त पाच फूट उंचीवर टांगावी. सकाळी 11 वाजेपर्यंत दहीहंडी फोडायची. ही जबाबदारी दहीहंडी बांधली त्या व्यक्तीची किंवा मंडळाची असेल. दहीहंडी फोडण्याआधी किंवा नंतर मिरवणूक किंवा गोंविदा खेळला जाणार नाही याची कटाक्षाने नोंद घ्यावी. संसर्गाचा धोका लक्षात घेऊन मुंबई व परगावातील चाकरमान्यांनी आवश्यक असेल तरच गणेशोत्सवासाठी गावी यावे. गावी येण्याआधी आपली वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. बाहेरील चाकरमान्यांनी गावी आल्याच्या दिवसापासून 14 दिवस होम क्वारंटाइन राहणे आवश्यक आहे. याबाबत अडचण असल्यास सरपंच, पोलीस पाटील किंवा ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधावा. तसेच ग्रामपंचायत हद्दीतील सर्व सात गावांतील गणपती पाच दिवसांचे असतील. कोरोनाचे संकट लक्षात घेता अनंत चतुर्थी किंवा 21 दिवसांच्या गणपतीस स्थगिती देण्यात येत आहे. पारंपरिक सामूहिक विसर्जन न करता विसर्जनाच्या दिवशी दुपारी 12 वाजेनंतर प्रत्येकाने सोयीस्कर वेळेप्रमाणे विसर्जन करावे. श्रींच्या निरोपाची आरती घरीच करून गणेशमूर्ती सार्वजनिक घाटावर न उतरवता थेट पाण्यात विसर्जन करावे. नियमांची अंमलबजावणी करताना सर्वांनी ग्राम कोरोना नियंत्रण पथकाचे सदस्य व कर्मचार्यांना सहकार्य करावे, असे विनंतीपूर्वक आवाहन वळके ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना करण्यात आले आहे. कोणीही व्यक्ती किंवा समूहाने नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर साथरोग अधिनियम 1897, फौजदारी दंड प्रकिया संहिता 1973चे कलम 144प्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.