पनवेल : रामप्रहर वृत्त
नगरसेवक संजय भोपी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष पुरस्कृत आणि संजय भोपी प्रतिष्ठान सिद्धिविनायक मित्र मंडळ आयोजित नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धा रविवारी (दि. 24) नुकतीच खांदा कॉलनीत रंगली. या स्पर्धेत रायगड फायटर्स संघाने विजेतेपद पटकाविले; तर तोरणा रेंजर्स संघ उपविजेता ठरला.
या स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्षे होते. स्पर्धेत खांदा कॉलनीतील आठ संघांनी सहभाग घेतला होता. सर्व संघांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांची नावे देण्यात आली होती.
स्पर्धेचे उद्घाटन रत्ना ट्रेंड्सचे मालक राहुल पारगावकर, भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष भीमराव पोवार, कार्यकारी अभियंता संजय पाटील, कामगार नेते मोतीलाल कोळी आणि नगरसेवक संजय भोपी यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेस पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते, युवकांचे प्रेरणास्थान परेश ठाकूर यांनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भाजप युवा मोर्चा पनवेल उपाध्यक्ष अभिषेक भोपी, सिद्धिविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहन होटकर, सचिन नाईक, सचिन धोत्रे, अभि कांबळे, शशी इंगळे, तसेच साईराज क्रिकेट क्लबच्या सदस्यांनी मेहनत घेतली.