अलिबाग : प्रतिनिधी
कोरोनामुळे पारंपरिक सणांवर पाणी फेरले जात आहे. गोपाळकालाही त्याला अपवाद ठरला नाही. ढाकुऽऽऽ माकूमऽऽऽ, मच गया शोर… गोविंदा रे गोपाळा…अशी वातावरणनिर्मिती करणारी गीते बुधवारी (दि. 12) कानावर पडली नाहीत. गोविंदांचे फिरणारे जत्थे हे चित्रही कुठे पाहायला मिळाले नाही.
मंगळवारचा श्रीकृष्ण जन्मोत्सवही अगदी साधेपणात साजरा झाला. मंदिरात आणि घरोघरीदेखील जन्माष्टमीची पूजा निवडक व्यक्तींच्या उपस्थितीत झाली, तर दुसर्या दिवशी आबालवृद्धांचे आकर्षण असलेला गोपाळकाला शासनाच्या निर्बंधांमुळे सुना सुना होता. मुसळधार पाऊस असूनसुद्धा गोविंदांना नाईलाजास्तव घरातच बसण्याची वेळ आली. गोविंदोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात डोक्याला बांधायच्या पट्ट्या, टी-शर्ट, टोप्या यांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होत असे. या वर्षी मात्र हा व्यवसाय ठप्प झाला. दरवर्षी लाखो रुपये बक्षिसांच्या दहीहंड्या बांधल्या जातात, पण यंदा त्या बांधल्या गेल्या नाहीत. काही गोविंदा पथकांनी आणि आयोजकांनी या पैशांतून सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर दिला.