खारघर : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोविड रुग्णांचा वाढता आकडा सर्वांसाठी चिंतेची बाब बनत असला तरी या रुग्णांमध्ये बरे होण्याचे प्रमाण सुमारे 80 टक्के पेक्षा जास्त असल्याने हि दिलासादायक बाब पालिकेच्या अहवालात स्पष्ट झाली आहे.विशेष म्हणजे केंद्राची कोविडने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णाची टक्केवारी 3.9 टक्के आहे.तर राज्याची टक्केवारी 3.7 एवढी असुन पनवेल महानगरपालिका क्षेत्रात हि टक्केवारी 2.4 एवढी आहे.
पालिका क्षेत्रात 8227 रुग्ण आहेत. यापैकी 6619 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला केवळ 1611 विद्यमान रुग्ण कोविड बाधित आहेत.कामोठे शहरात कोरोनाचे सर्वाधिक 1775 रुग्ण आहेत. तर तळोजे शहरात सर्वात कमी 500 रुग्ण आहेत. आजवर पालिका क्षेत्रात 197 रुग्ण कोरोनाने मृत्युमुखी पावले आहेत. पनवेल शहरात 26 विद्यमान रुग्ण आहेत तर सर्वाधिक 401 रुग्ण कळंबोलीमध्ये आहेत. पालिकेने कोविडच्या टेस्टिंग वाढविल्याने लवकरात लवकर कोविडच्या रुग्णांना उपचार मिळत असल्याने पनवेल मध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये अँटीजेन टेस्ट मुळे तत्काळ अवघ्या काही तासात कोविड डिटेक्ट होत आहेत. कोविडच्या साथीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेच. त्यासोबत खाजगी डॉक्टरांना देखील कोविडच्या रुग्णांवर घरोघरी जाऊन उपचार करण्याची परवाणगी पालिकेच्या मार्फत दिली गेली असल्याचे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले.जास्तीत जास्त कोविड रुग्णांना उपचार मिळावे याकरिता खाजगी कोविड रुग्णालयांची संख्या देखील 11 वरून 14 केली असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
पालिकेच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालय पनवेल, एमजीएम रुग्णालय कामोठे आदी ठिकाणी कोविडच्या रुग्णांवर उपचार केले जातआहे. तर देवांशी इन, इंडिया बुल्स, पोलीस मुख्यालय रोडपाली आदी ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात आलेले आहेत. पालिका क्षेत्रात खाजगी रुग्णालयात कोविड रुग्णांच्या उपचारासाठी प्रत्येक रुग्णालयात किती खाटा शिल्लक आहेत. हि माहिती पालिका आपल्या अहवालात देत आहे.
पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात टेस्टिंग वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाधितांना लवकरात लवकर उपचार मिळत आहे. डॉक्टरांना घरोघरी जाऊन कोविड रुग्णांवर उपचारासार परवाणगी देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. विशेष म्हणजे पालिका क्षेत्रातील मृत्युदर नियंत्रणात आहे.
-सुधाकर देशमुख,आयुक्त, पनवेल महानगरपालिका