नगरसेवक विक्रांत पाटील यांची मागणी
पनवेल : वार्ताहर
पनवेल शहरातील विद्युत वाहिन्या त्वरीत भुमिगत कराव्यात, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शहरातील विद्युत वाहिन्या भुमिगत व्हाव्यात यासाठी यापूर्वीही अनेकवेळा मागणी केली आहे. परंतु सध्या याची आवश्यकता नाही व ही आपली प्राथमिकता नाही यावर खर्च नको असे कारण सांगून हा विषय अनेक वेळा टाळला गेला आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या निसर्ग चक्रीवादळ व 5 जुलै रोजी झालेल्या वादळी वार्यासह पावसाने पनवेलची अवस्था अतिशय दयनीय करून टाकली होती व विद्युत तारा रस्त्यावर अक्षरशः उन्मळून पडल्याचे चित्र दिसून येत आहे. काही भागात 72 तासांपेक्षा जास्त काळ विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. आपण एकीकडे शहर अद्यावत करण्याचा प्रयत्न करीत असताना पनवेल वासियांना पुर्णवेळ विद्युत पुरवठासुद्धा देऊ शकत नाही हे आपल्यासाठी खेदजनक बाब आहे.
विद्युत वाहिन्या भुमिगत करणे ही जबाबदारी महापालिका म्हणून आपण स्विकारल्यास पनवेलमधील नागरिकांचे जीवनसुद्धा सुसह्य होऊ शकते. तरी विद्युत वाहिन्या भुमिगत करण्याकडे आपण प्राथमिकता पाहून या विषयावर आपण कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.