पनवेल : बातमीदार
कोरोनाकाळात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे घरी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आणण्याबरोबरच तिचे गृहसंकुलाशेजारी विसर्जन करण्याचा निर्णय अनेकांनी घेतला आहे. याच वेळी गणरायाच्या आगमनादिवशी वा त्याआधी मूर्तीकारांच्या कार्यशाळेत गर्दी होऊ नये, यासाठी नागरिकांनी एक आठवडा आधीच मूर्ती घरी आणण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी मखरासाठीचे साहित्य, विद्युत रोषणाईची तयारी दहा ते 15 दिवस आधी तयारी केली जाते. यंदा गणेशाची साध्या मखरात प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यामुळे मूर्ती आठ ते दहा दिवस आधी घरी आणण्यात आल्या आहेत. करोनाकाळात वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात नवे मखर दाखल झालेले नाहीत. खरेतर पर्यावरणपूरक कापडी आणि कागदी नक्षीदार मखरांची काही जण दोन महिने आधीच नोंदणी करतात. हे सर्व साहित्य आणि कापड गुजरातमधून येते. त्यावरील नक्षीकाम राजस्थान आणि कोल्हापूरमधील कारागीर करतात. नवी मुंबईतील नामांकित मंडळांनी यंदा अवघ्या दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याचे नियोजन आखले आहे. याच वेळी काही मंडळांनी गणरायाचे ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही मंडळे आरोग्य शिबीरे भरवणार आहेत. गणेश मंडपाशेजारीच कृत्रिम तलावात श्रींचे विसर्जन करण्याचे नियोजन आखले आहे. शिवछाया मित्र मंडळाचे अध्यक्ष अंकुश वैती यांनी सांगितले की, नवी मुंबईचा राजा हा नवी मुंबईतील पहिला सार्वजनिक गणपती आहे, यावर्षी आमचा सुवर्णमहोत्सव होता,मात्र करोना साथरोगामुळे दीड दिवसाचा उत्सव करण्यात येणार आहे. गणेशचतुर्थी आधी एक वा दोन दिवस, नाहीतर चतुर्थीला गणेशमूर्ती घरी नेण्याची आजवरची परंपरा यंदा खंडित झाली,अशी प्रतिक्रिया सानपाडा येथील संतोष थोरात यांनी दिली.