मुरूड : प्रतिनिधी
भाजपने अदाड गावातील विकासकामांना प्राधान्य देऊन या गावाचा विकास साधला आहे. त्याचप्रमाणे मुरूड तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले जाईल. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर येताच मुरूड तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यात येतील, अशी ग्वाही भाजपचे अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी अदाड येथे दिली.
मुरूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीमधील अदाड गावात समाज मंदिर उभारण्याकरिता भाजपच्या माध्यमातून व अॅड. मोहिते यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन मंडळाकडून 10 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या कामाचे भूमिपूजन अॅड. महेश मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात अॅड. मोहिते बोलत होते. या मतदारसंघात महायुतीचे महेंद्र दळवी आमदार म्हणून निवडून आले असून, त्यांचे सहकार्य घेऊन तालुक्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
मुरूड शहराच्या विकासाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून या कामासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शिफारस केली असल्याने शासनाकडून नगर परिषदेस कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. त्यातून समुद्रकिनारी दगडी बंधरा बांधण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे सांगून अॅड. मोहिते यांनी या वेळी समाज मंदिरासाठी लागणारा उर्वरित निधी त्वरित मिळवून देण्याचे अभिवचन दिले. भाजपचे मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, उपाध्यक्ष महेश मानकर, समीर शिंदे, उद्देश पाटील, प्रभाकर पाटील, पोलीस पाटील दत्ताराम वाडकर, शरद मोरे, निलेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य संकेश पाटील, दयाराम वाडकर, भरत पाटील, दामोदर गुंड, तुकाराम वाडकर, सदानंद पाटील, भाऊ पाटील, सागर वाडकर यांच्यासह ग्रामस्थ या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.