Breaking News

कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने खारघर टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांना मिळाला न्याय

खारघर : प्रतिनिधी

लॉकडाऊनमध्ये अनेक संकटांना तोंड द्यावे लागत असताना सायन-पनवेल महामार्गावरील खारघर टोल नाक्यावर मागील सात वर्षांपासून कार्यरत असलेल्या 39 कर्मचार्‍यांना एप्रिल महिन्यापासून कामावरून तडकाफडकी कमी करण्यात आले होते. टोल कंत्राटदाराच्या या भूमिकेमुळे कामगारांनी आंदोलनाचा पर्याय निवडला होता, परंतु या आंदोलनापूर्वी झालेल्या बैठकीत कंत्राटदाराने पहिल्या टप्प्यात 17 कामगारांना कामावर रूजू करण्याची तयारी दाखविली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने टोल कामगारांना न्याय मिळाला आहे.

या बैठकीला टोल कंत्राटदार डी. आर. सर्व्हिसेसचे मालक राजकुमार ढाकणे, नगरसेवक अ‍ॅड. नरेश ठाकूर आदींसह टोल कर्मचारी उपस्थित होते. संबंधित 17 कर्मचारी टोल सुरू होण्यापासून या ठिकाणी कार्यरत असल्याने पहिल्या टप्प्यात त्यांना कामावर घेण्यास टोल कंत्राटदार ढाकणे यांनी समर्थता दाखविली आहे. टोल कर्मचार्‍यांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक अ‍ॅड. नरेश ठाकूर मागील दोन महिन्यांपासून पाठपुरावा करीत होते. या संदर्भात त्यांनी कामगार आयुक्त, एमएसआरडीसी, खारघर पोलीस ठाणे आदींसोबत पत्रव्यवहार केला. अन्यायकारकपणे कामावरून काढून टाकल्याप्रकरणी 17 ऑगस्ट रोजी हे कर्मचारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलनही करणार होते. तत्पूर्वी कंत्राटदाराने पहिल्या टप्प्यात 17 कामगारांना कामावर रूजू केल्याने संबंधित आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याचे नगरसेवक अ‍ॅड. ठाकूर यांनी सांगितले. उर्वरित 22 कामगारांना कामावर घेण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार आमचा पाठपुरावा सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले, तसेच पोलीस प्रशासनाला सहकार्याबद्दल धन्यवाद दिले आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply