Breaking News

ठाकूर पितापुत्रांमुळे बारणेंचा विजय निश्चित

पनवेल : प्रतिनिधी

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे मावळ मतदारसंघातील शिवसेना भाजप युतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित असल्याची ग्वाही शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी दिली आहे. पनवेल येथे प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.

मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत आमच्यासोबत भारतीय जनता पक्ष सोबत असला, तरीही रामशेठ ठाकूर यांच्यासारखे प्रभावी नेतृत्व पाठीशी नव्हतं, परंतु या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या रूपाने शिवसेना-भाजप युतीला एक नवी ऊर्जा मिळाली आहे. त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची वाढती लोकप्रियता व दांडगा जनसंपर्क या एकत्रिकरणातून श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित झाला असून त्यांना किमान दोन लाखांहून अधिक मताधिक्य मिळेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचा आत्मविश्वास बबनदादा पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पार्थ पवार हा नवखा उमेदवार आहे, तसेच त्यांचे या मतदारसंघात मत देखील नाही अशा परिस्थितीत प्रथमच ते थेट लोकसभेची निवडणूक लढवत आहेत, परंतु संसदेत जाण्यासाठी त्या पात्रतेच्या लोकप्रतिनिधीची गरज आहे. त्यामुळे या ठिकाणी केवळ श्रीरंग बारणे हेच योग्य प्रतिनिधी आहेत म्हणून जनमत हे बारणे यांच्या पारड्यातच भरघोस मताधिक्य टाकेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.

केवळ नातवाच्या प्रेमापोटी शरद पवार यांनी या निवडणुकीतून माघार घेतली, परंतु ही चूक पार्थ पवारच्या रूपाने पराभव पत्करायला लावणारी आहे, अशी खोचक टीकादेखील पाटील यांनी केली.

पवारांना वाटले असेल हे  पनवेल बारामतीप्रमाणे आहे. त्यामुळे इथेही यश संपादन करता येईल, तर असा गैरसमज त्यांनी मुळीच करू नये, याउलट हे पनवेल सुज्ञ मतदारांचे आहे इथला मतदारराजा कधीच कोणाला बांधील राहिला नाही. त्यामुळे पार्थ पवारच्या पराभवाने पवार कुटुंबाच्या तिसर्‍या पिढीला मोठा राजकीय धक्का बसेल, असा ठाम विश्वास बबनदादा पाटील यांनी व्यक्त केला.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply