राज्यात पाचव्या, तर देशात 20व्या स्थानी
पनवेल : रामप्रहर वृत्त
स्वच्छ भारत सर्वेक्षण 2020मध्ये पनवेल महानगरपालिकेने मुसंडी मारत राज्यात पाचवा, तर देशात 20वा क्रमांक पटकाविला आहे. नवी महापालिका असूनही एवढी जबरदस्त कामगिरी केल्याने कौतुक होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या स्वच्छतेच्या आवाहनानुसार पनवेल महापालिकेने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी प्रशासनाला सोबत घेऊन विविध उपाययोजना राबविल्या. दैनंदिन स्वच्छतेवर विशेष भर दिला. स्वच्छ, सुंदर पनवेलची संकल्पना सर्वांनी मिळून प्रत्यक्षात साकारली आहे.
केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षण 2020चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 20) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या निकालांची घोषणा केली. यात पनवेल महापालिका देशात 20व्या, तर राज्यात पाचव्या स्थानी आली आहे.
मागील वर्षी या सर्वेक्षणात पनवेल महापालिका देशात 86व्या आणि राज्यात 25व्या स्थानी होती. मनपातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि नव्या अधिकारीवर्गाने हातात हात घालून एकदिलाने काम केल्याने कामगिरी उंचावल्याचे दिसून येते. याबद्दल सर्वांचे विशेष कौतुक आणि अभिनंदन होत आहे.