Breaking News

रायगडातील 543 शाळा होणार बंद

पटसंख्या कमी असल्याने निर्णय;  माहिती संकलनाचे काम सुरू

अलिबाग ः प्रतिनिधी

राज्यातील 0 ते 20 पटसंख्या असलेल्य शाळा बंद करण्याबाबत शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे झाल्यास रायगड जिल्ह्यातील जवळपास 543 शाळा बंद होण्याची शक्यता आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती जमा करण्याच्या सूचना शिक्षण अधिकार्‍यांनी गटशिक्षण अधिकार्‍यांना दिल्या आहेत. पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र या निर्णयाला शिक्षक आणि पालक संघटनांनी विरोध केला होता. त्यामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला. 2017मध्ये जिल्ह्यातील एकही शाळा पटसंख्येअभावी बंद करण्यात आली नव्हती. आता पुन्हा एकदा पटसंस्ख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी तसे संकेत दिले आहेत. शिक्षणविभागाकडून याबाबतची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात दोन हजार 637 शाळा आहेत.  यापैकी 543 शाळांची पटसंख्या ही 20पेक्षा कमी आहे. त्यामुळे कमी पटसंस्ख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा ठोस निर्णय झालाच, तर 543 शाळा बंद कराव्या लागू शकणार आहेत. ही एक चिंतेची बाब आहे. याचा सर्वाधिक फटका हा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे.

कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती संकलन करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी तालुका पातळीवर गटशिक्षणाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. ही माहिती संकलित झाल्यानंतर शासनाचा आदेश येईल. त्यानंतरच पुढील योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे.

-पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग

कमी पटसंख्येच्या शाळेवर दोनऐवजी एक शिक्षक कार्यरत ठेवून शाळा सुरू ठेवणे विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरेल. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या भूमिकेला रायगडात शिक्षकांचा विरोध राहणार आहे.

-राजेश सुर्वे, राज्याध्यक्ष, प्राथमिक शिक्षक परिषद

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply