कोरोना व पाऊस झुगारून बाजारपेठेत गर्दी
अलिबाग : प्रतिनिधी
कोरोनाचे संकट, त्यानंतर बसलेला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा यातून सावरले रायगडकर आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमसाठी सज्ज झाले आहेत. शनिवारपासून (दि. 22) गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. रायगड जिल्ह्यात 287 सार्वजनिक आणि एक लाख 239 घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. गणपतीच्या आगमनाची तयारी पूर्ण झाली असून, पूजा व आरास साहित्याची खरेदी करण्यासाठी शुक्रवारी (दि. 21) बाजारपेठांमध्ये भरपावसात गर्दी उसळली होती.
गणेशत्सवासाठी रायगडात परजिल्ह्यातून चाकरमानी आले आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनदेखील काळजी घेत आहे. सर्व तालुक्यांमध्ये अँटीजेन चाचणीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याबाबत जनजागृती ही केली जात आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून पोलीस यंत्रणेने तयारी केली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 16 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. 25 पोलीस अधिकार्यांसह 217 कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत. रुग्णवाहिका, क्रेन, मदत केंद्र आणि वायरलेस यंत्रणाही रायगड पोलिसांकडून ठिकठिकाणी ठेवण्यात आली आहे.
खारपाडा, हमरापूर, पेण, वडखळ, इंदापूर, माणगाव, महाड, पोलादपूर, कशेडी घाट या महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस चौक्यांसह, रुग्णवाहिका आणि क्रेनचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. पेण-खोपोली बायपासवर चार, रामवाडी चौकी तीन, वडखळ तीन, इंदापूर स्थानक एक, महाड शहरातील नातेखिंड मदत केंद्रात तीन, विसावा हॉटेल परिसरात एक व पाली येथे दोन असे एकूण 16 ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.