अलिबाग़ ़: प्रतिनिधी
तालुक्यातील बहुचर्चित चोंढी-रेवस मार्गावरील सारळ समुद्र किनार्याजवळील दगडी पूल पुन्हा एकदा कमकुवत म्हणून घोषित करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरून वाहने सावकाश चालविण्याचे आवाहन केले आहे. तसे फलक पुलाच्या दोनही बाजूला लावण्यात आले आहेत. 1980 च्या दशकात सारळ समुद्र किनार्यावर दगडी पूल उभारण्यात आला होता. मागील पाच वर्षे या पुलाच्या धोकादायक स्थितीकडे स्थानिक प्रशासन, प्रसारमाध्यमातून बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला. सुरुवातीला दुर्लक्ष झाले, त्या नंतर हा पूल पाडून नवीन पूल उभारण्यासाठी निधी मंजूर झाला. या पुलाच्या कामासाठी सुमारे 85 लाख रुपये मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. तेव्हाही सारळ पुलाच्या दोन्ही बाजूला धोकादायक म्हणून फलक लागले होते. पण प्रत्यक्षात पुलाचे काम सुरू झाले नाही. केवळ कठडे बांधून आणि पुलाखालील भागाचे सिमेंट काँक्रीटीकरण करून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. मागील दोन वर्षे निसर्ग आणि तौत्के यासारखी चक्रीवादळे येऊन गेली. आमावस्या-पौर्णिमेला येणार्या उधाणाच्या लाटा या पुलाने सहन केल्या. सुदैवाने पुलाचे कोणते नुकसान झाले नाही.दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा सारळ पुलाचे सर्व्हेक्षण झाले. त्यानंतर आता दोन दिवसांपूर्वी हा सारळ पूल पुन्हा धोकादायक म्हणून ठरविण्यात आला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला सावधानतेच इशारा देणारे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे या सारळ पुलाचे नूतनीकरण किंवा नव्याने पुलाची उभारणी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही अपेक्षा लवकर पूर्ण व्हावी, अशी प्रतिक्रिया येथे उमटत आहे. रेवस-करंजा रोरो सेवेच्या पार्श्वभूमीवर पुलावरून वाहतूक वाढणार आहे, त्यामुळे सारळ पुलाचे काम जलदगतीने हाती घेणे आवश्यक आहे.