Breaking News

माथेरानच्या डोंगरातील वाड्या रस्ते आणि विजेच्या प्रतीक्षेत

वन जमिनीतून जागा देण्याची मागणी

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगरात असलेल्या 12 आदिवासी वाड्या या रस्ता आणि काही वाड्या विजेपासून वंचित आहेत. येथील आजारी रुग्णाला आजही डोली करून आणावे लागत आहे. दरम्यान, आदिवासी संघटना या प्रश्नी आक्रमक झाल्या असून, त्यांनी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.

कर्जत हा आदिवासीबहुल तालुका असून, माथेरानच्या डोंगरात 12 आदिवासी वाड्या वनजमिनीवर वसल्या आहेत. या ठिकाणचे लोक वन विभागाच्या दळी जमिनीवरील रस्ता श्रमदान तयार करतात. नेरळ-माथेरान घाटरस्त्यात जुम्मापट्टी धनगर वाडा सोडल्यानंतर पुढे असलेल्या आदिवासी वाड्या रस्त्यापासून वंचित आहेत. त्यात बेकरेवाडी, आसलवाडी, भूतीवलीवाडी, धामणदांड, नाण्याचा माळ, पाली धनगर वाडी, आषाणेवाडी, सावरगाव वाडी, किरवली वाडी यांचा समावेश आहे. आदिवासी ग्रामस्थांनी श्रमदान करून आसलवाडीपर्यंत पायवाट बनवली आहे, पण पुढे तो रस्ता जात नसल्याने सागाचीवाडी, चिंचवाडी आणि आसल ग्रामपंचायतमधील वाड्या या वाहने जाणार्‍या रस्त्याबरोबर पायवाटेनेदेखील आपल्या घरी सुखरूप पोहचत नाहीत.

येथील आदिवासी लोकांचे आरोग्य प्रामुख्याने जंगलात असलेल्या आयुर्वेदिक औषधांवर अवलंबून असते.  मोठ्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना वाडीमधील 10-15 तरुणांना एकत्र येऊन डोली करावे लागते आणि मूळ रस्त्यावर आणून तेथून दवाखान्यात जाण्याची व्यवस्था करावी लागते. रस्त्याची सुविधा नसल्याने आदिवासींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते जैतू पारधी यांनी वनजमिनीतून रस्ते बनविण्याचे आवाहन राज्य शासनाला केले आहे, तर आदिवासी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष मालू निरगुडे यांनी रस्ते आणि विजेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी माथेरानच्या डोंगरातील सर्व आदिवासी एकत्र येऊन उपोषण करू, अशी भूमिका घेतली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply