Breaking News

कर्जत एसटी आगारातील कर्मचारी आगारप्रमुखांविरोधात आक्रमक

7 एप्रिलपासून उपोषणाचा इशारा

कर्जत ः बातमीदार

कर्जत एसटी आगारातील कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि कामगारवर्गावर आगारप्रमुखांकडून होत असलेल्या कारवाईविरोधात आक्रमक झाले आहेत. गेली अनेक महिने आगारप्रमुखांना कामगार संघटनेकडून निवेदने दिली जात आहेत, मात्र त्याची दखल न घेता आगारप्रमुख कामगारवर्गावर अन्याय करीत असल्याने महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी 7 एप्रिलपासून उपोषणाला बसणार आहेत.

कर्जत एसटी आगराचा खालापूर व कर्जत या दोन तालुक्यांत पसारा आहे. कर्जत एसटी आगारातील कर्मचारी आगारप्रमुख शंकर यादव यांच्या मनमानी कारभाराला कंटाळले आहेत. कर्जत आगारातील अधिकृत कामगार संघटना आपल्या समस्यांबाबत व कामगारांच्या वैयक्तिक समस्या, अडचणींबाबत आगारप्रमुखांना सांगत आहेत, पण आगारप्रमुखांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. 30 जुलैला कामगारांचे नियमबाह्य निलंबन केल्यानंतर त्या कामगारांचे व संघटनेचे म्हणणे अद्याप आगारप्रमुखांनी ऐकून घेतले नाही. कोरोना महामारीत कामगारांच्या रजा मंजूर करताना भेदभाव केला. प्रकृती ठीक नसलेले कामगार उपस्थिती झाले नाहीत म्हणून त्यांच्या रजा अद्याप मंजूर करण्यात आल्या नाहीत. कोरोनाकाळात आगारातून केवळ माल वाहतूक सुरू होती, मात्र त्यावेळीही कामगारवर्गाला रजा मंजूर करून घेण्यासाठी कामगार संघटनेला आगारप्रमुखांना विनवणी करावी लागत होती.

आगारातील कार्यशाळा बसेसला दोनदा अपघात झाले, मात्र आपल्याजवळ वावरणार्‍यांवर कमी दंडाची, तर कामगार संघटनेच्या कामगारांवर कडक कारवाई आगारप्रमुखांनी केली. माल वाहतूक करताना चालकासोबत वाहक आवश्यक असताना चालक हा कामगार संघटनेचा असेल तर वाहक दिला जात नाही. माल वाहतूक करणार्‍या एसटी गाड्यांचे टायर कमी व्हीलचे वापरण्यात येत असून अपघात होण्याची शक्यता माहिती असूनही आगारप्रमुख 10.00.20 या आकाराच्या टायरऐवजी 9.00.20 आकाराचे टायर वापरलेल्या गाड्या पाठवून वाहतूक करीत आहेत. महिला कर्मचार्‍यांची क्षमता लक्षात न घेता आगारप्रमुख एका महिला कर्मचार्‍याला सलग 10 दिवस काम करायला लावतात.

तिकिटासाठीच्या 90 टक्के ईटीआयएम मशिन बंद पडल्या आहेत. कर्जत आगार व खोपोली स्थानक येथे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना पास देण्यासाठी कायमस्वरूपी कामगार नियुक्त नाहीत. आगारातील कामगारांना पाणीटंचाई भासत आहे. या सर्व मागण्यांसाठी कर्जत आगारातील मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी आगारप्रमुख शंकर यादव यांना निवेदने देऊन चर्चा करण्याची मागणी केली आहे, मात्र गेल्या आठ महिन्यांपासून आगारप्रमुख वेळ देत नाहीत. या सर्व बाबींवर आगारप्रमुखांनी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून कामगारांचे प्रश्न सोडविले नाहीत, तर 7 एप्रिलपासून महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी उपोषणाला बसणार आहेत, असा इशारा पेण रामवाडी येथील एसटी महामंडळाच्या जिल्हा वाहतूक नियंत्रकांना दिलेल्या पत्रात देण्यात आला आहे.

आम्ही शासनाच्या आदेशाने काम करीत असून, सर्व कामगारवर्गाला बरोबर घेतल्याशिवाय हा सामूहिक गाडा पुढे जाणार नाही. त्यामुळे कामगार संघटनेने प्रशासनाबरोबर एकत्र येऊन काम केले पाहिजे. त्यासाठी आपण कामगार संघटनेशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊन आंदोलन होणार नाही याची काळजी घेऊ.

-शंकर यादव, आगारप्रमुख

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply