Breaking News

नवी मुंबई महानगरपालिकेस पंचतारांकित मानांकन

नवी मुंबई ः वार्ताहर

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत मंगळवारी (दि. 19) देशातील कचरामुक्त शहरांना देण्यात येणार्‍या स्टार रेटिंगची घोषणा केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी केली. त्यामध्ये नवी मुंबईला पुन्हा एकदा फाइव्ह स्टार रेटिंग जाहीर झाले आहे. देशातील सहा शहरांना कचरामुक्त शहराचे फाइव्ह स्टार रेटिंग जाहीर झाले असून त्यामध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तीन वेळा वेगवेगळ्या केंद्रीय स्वच्छता निरीक्षक पथकांकडून स्टार रेटिंगच्या निकषान्वये बारकाईने सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये केंद्र सरकारमार्फत नियुक्त त्रयस्थ संस्थेच्या निरीक्षक पथकांनी कागदपत्रांची पाहणी केली होती, तसेच विविध स्थळांना अचानक भेट देऊन विविध ठिकाणच्या स्वच्छतेची व कचरा वर्गीकरण स्थितीची पाहणी केली होती. त्याचप्रमाणे कचर्‍याचे संकलन व वाहतूक पध्दती तसेच कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया पाहण्यात आली होती. कोणतीही पूर्वसूचना न देता विविध ठिकाणांना भेटी देत तेथील नागरिकांशी ऐनवेळी संवाद साधून त्यांचे प्रत्यक्ष अभिप्रायही केंद्रीय पथकांकडून जाणून घेण्यात आले होते. अशा सर्वंकष पाहणीच्या आधारे गुणांकन करण्यात येऊन कचरामुक्त शहराचे स्टार रेटिंग जाहीर करण्यात आले आहे.

यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस फाइव्ह स्टार रेटिंग प्राप्त झाले आहे. नवी मुंबईसह मध्य प्रदेशमधील इंदौर, कर्नाटकमधील म्हैसूर, गुजरातमधील सुरत व राजकोट आणि छत्तीसगढमधील अंबिकापूर ही देशातील इतर शहरे फाइव्ह स्टार रेटिंगची मानकरी ठरली आहेत. मागील वर्षीही नवी मुंबई महानगरपालिकेने कचरामुक्त शहराचे फाइव्ह स्टार रेटिंग प्राप्त केले होते. त्याचप्रमाणे स्वच्छ सर्वेक्षण 2019मध्ये स्वच्छ शहरात राज्यात सर्वप्रथम व देशात सातव्या क्रमांकाच्या शहराचे मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झाले होते. – महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी या फाइव्ह स्टार रेटिंगचे श्रेय दैनंदिन स्वच्छता करणार्‍या सफाई कामगारांपासून स्वच्छतेविषयी जागरूक असणारे लोकप्रतिनिधी तसेच प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकांना दिले आहे. तसेच कोरोनाबाधितांकडून होणार्‍या कचर्‍याची स्वतंत्रपणे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे, असेही मिसाळ यांनी या वेळी सांगितले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply