पनवेल : रामप्रहर वृत्त
सुश्मिता सिन्हा यांनी जाणूनबुजून हेतुपुरस्सर हिंदू देवी देवतांचा अपमान करून धार्मिक भावनांना इजा पोहचविली आहे तसेच जातीय असंतोष पसरविण्याचा प्रयत्न केला असल्याने सिन्हा विरोधात भारत रक्षा मंचने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
यूट्यूब वर सुश्मिता सिन्हा या महिलेने तीज को ना करें, तेज बने अशा मथळ्याने हरतालिका पूजेची विटंबना करणारा विडिओ प्रसारित केला आहे. महाराष्ट्रासहित भारताच्या अनेक भागांत हिंदू महिला श्रद्धापूर्वक हरतालिका तीजच्या दिवशी आपल्या पतीच्या दिर्घायुष्याकरिता उपवास करतात. या प्रथेचा अतिशय घाणेरड्या पद्धतीने अपमान करणारा विडिओ सिन्हा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेल वरून प्रसारित केला आहे. या व्हिडिओत सिन्हा यांनी स्त्रियांना जबरदस्तीने पाणी देखील पिऊ दिले जात नाही आणि हे स्त्रियांचे शोषण आहे असे म्हटले आहे. पण हिंदू संस्कृतीत कोणतेही व्रत हे स्वेच्छेने केले जाते आणि त्यात कुणावरही कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केली जात नाही. या पलीकडे जाऊन या महिलेने हरतालिका व्रताच्या पुस्तिकेची घोर विटंबना करत या पुस्तिकेला संडासात विष्ठा साफ करण्याकरिता वापरावे असे म्हणत हे पुस्तक पाश्चात्य पद्धतीच्या संडासात जिथे टॉयलेट पेपर लावतात तिथे ठेवून त्याचा फोटो काढून प्रसारित केला आहे. या पुस्तकावर भगवान शंकर आणि माता पार्वती यांची चित्रे आहेत. गणेशोत्सवाच्या काळात जातीय असंतोष पसरविण्याचा प्रयत्न देखील केला आहे. अलीकडेच कुणीतरी मुस्लिम धर्माबद्दल अपशब्द काढल्यामुळे बंगळुरू येथे भयंकर प्रकारचे हिंसक हल्ले मुस्लिम समाजाकडून झाले. सिन्हा यांचा देखील हाच प्रयत्न असल्याचा आरोप भारत रक्षा महिला मंचच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा बिना गोगरी यांनी केला आहे. या संदर्भात त्या महिलेवर त्वरित कारवाईची मागणी गोगरी यांनी निवेदनाद्वारे खारघर पोलिसांकडे केली आहे. या वेळी अंन्जु पटेल, अल्पना डे, निर्मला यादव, वैशाली प्रजापति, गीता चौधरी, निता गोगरी, मधुमिता जेना आदी मंचच्या सदस्या उपस्थित होत्या.