पनवेल : प्रतिनिधी
ऑनलाइन शिक्षणाच्या नावावर खाजगी शाळांकडून पालकांची लूट सुरूच आहे. शाळा सुरू होईपर्यंत फिसाठी सक्ती करू नका असे आदेश शिक्षण विभागाने दिलेले असतानासुद्धा ते बासनात बांधून शाळांकडून पूर्ण वार्षिक शुल्काचा तगादा लावण्यात येत आहे. शाळांनी ऍक्टिव्हिटी सह इतर शुल्क देऊ नये अशा प्रकारचे आदेश शाळांना द्यावेत, अशी मागणी नगरसेवक संतोष शेट्टी यांनी केली आहे.
पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात खाजगी शाळा आहेत. याठिकाणी लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मार्चपासून बंद झालेल्या शाळा अद्याप सुरू होऊ शकल्या नाहीत. राज्यातील एकही शाळेतील वर्ग भरलेला नाही. दरम्यान ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय पुढे आणण्यात आला. राज्य शासनानेही अशा पद्धतीने शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत मंजुरी दिली. त्यानुसार जून पासून हे शैक्षणिक वर्ष कागदावर तरी सुरू झाले आहे. ऑनलाइन फी भरा अशा प्रकारचे मेसेज शाळांकडून पाठवले जात आहेत. त्यासाठी वर्ग आणि तुकडी निहाय व्हॉट्सऍप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. वर्गशिक्षिका त्याचे ग्रुपच्या डमिन असून त्या बाबत तासातासाला अपडेट देत आहेत. तुम्ही भरा अन्यथा विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात घेतले जाणार नाही. अशा प्रकारची धमकी सुद्धा पालकांना दिली जात आहे. कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने शाळा सुरू होतील तशी परिस्थिती नाही. त्यासाठी किती वेळ लागेल हेही कोणी सांगू शकत नाही. दरम्यान ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाला फारसा खर्च येत नाही. विद्यार्थी शाळेत येणार नसल्याने शाळांना फारशी जबाबदारी नाही. त्याचबरोबर इतर ऍक्टिव्हिटीज घेतल्या जात नाहीत. संगणक क्लास भरत नाहीत. त्यामुळे फक्त क्लास फी वगळता इतर शुल्क घेतले जाऊ नये, अशी मागणी नगरसेवक संतोष शेट्टी यांनी केली आहे. कोरोना व लॉकडाऊन मुळे पालक वर्ग मेटाकुटीस आला आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. या स्थितीत शाळांनी शैक्षणिक शुल्क कमी करावे असा मुद्दा शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
शासनाने ऑनलाइन शिक्षणाला परवानगी दिली आहे. परंतु प्रत्यक्ष शाळा सुरू नसताना संपूर्ण वार्षिक शुल्क घेणे योग्य नाही. त्यामुळे क्लास वगळता खाजगी शाळांनी इतर शुल्क आकारू नये अशा प्रकारचे आदेश संबंधितांना देण्याची गरज आहे. – संतोष शेट्टी, ज्येष्ठ नगरसेवक, पनवेल महानगरपालिका