लॉकडाऊनमध्ये शेअर बाजारात अनेक नवीन गुंतवणूकदार आले आणि त्यांची पसंती साहजिकच मिडकॅप व स्मॉलकॅप कंपन्यांना असल्याने अशा कंपन्यांच्या शेअर्सना वाढीव तरलता मिळून त्यामध्ये तेजी आली. अशा कंपन्यांमध्ये एक मूल्य-दुरुस्ती (प्राइस करेक्शन) शक्यता नाकारता येत नसली तरी अजूनही यात धुगधुगी आहेच.
मागील आठवडा बाजारात चौफेर तेजी पाहायला मिळाली आणि त्याला बँकिंग स्टॉक्सनीदेखील हातभार लावला, परंतु 2020 या सालात अजूनही बीएसई सेन्सेक्स सुमारे साडेचार टक्के खालीच (निगेटिव्ह) आहे, मात्र बीएसई मिडकॅप इंडेक्स या कॅलेंडर वर्षात दीड टक्क्याने वर (पॉझिटिव्ह) आहे. मार्च महिन्यात म्हणजे जेव्हा आपल्या बाजाराने मे 2016ची नीचांकी पातळी गाठली तेव्हापासूनचा विचार केल्यास आतापर्यंत बीएसई सेन्सेक्स जवळपास 48 % वधारलाय, तर बीएसई मिडकॅप निर्देशांकाने 54 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवलीय. याचा सरळ सरळ अर्थ आहे की ब्ल्यूचिप म्हटल्या जाणार्या अव्वल कंपन्यांपेक्षा या छोट्या कंपन्यांनी बाजी मारलेली आहे. याचे कारण म्हणजे बाजारात आलेला पैसा. मागील महिन्यांतील लॉकडाऊनमध्ये शेअर बाजारात अनेक नवीन गुंतवणूकदार आले आणि त्यांची पसंती साहजिकच मिडकॅप व स्मॉलकॅप कंपन्यांना असल्याने अशा कंपन्यांच्या शेअर्सना वाढीव तरलता मिळून त्यामध्ये तेजी आली. अशा कंपन्यांमध्ये एक मूल्य-दुरुस्ती (प्राईस करेक्शन) शक्यता नाकारता येत नसली तरी अजूनही यात धुगधुगी आहे. कारण मागील तीन सव्वातीन वर्षांचा विचार केल्यास बीएसई सेन्सेक्सने 26 टक्के परतावा दिलेला दिसतोय, मात्र मिड कॅप निर्देशांकाचा परतावा अजूनही केवळ तीन टक्केदेखील नाही. त्यामुळे एखाद्या मूल्य-दुरुस्तीनंतर ह्यात पुन्हा तेजी गृहीत धरली जातेय, मात्र त्यासाठी डोळे उघडे ठेवून उत्तम कंपन्यांवरच भर दिल्यास पुन्हा संधी साधता येऊ शकते. आजच्या लेखात आपण काही निवडक मिडकॅप अथवा स्मॉलकॅप कंपन्यांविषयी जाणून घेऊयात.
अशा कंपन्या निवडताना त्यांचा नफा, उत्पादकता आणि बाजारातील वाटा वाढविण्याची क्षमता याविषयी प्रामुख्याने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यातच कमीत कमी कर्ज असलेल्या कंपन्या त्याचप्रमाणे कच्चा माल अथवा तत्सम गोष्टींवर कमीत कमी खर्च करणार्या कंपन्यांचा नफा लवकरात लवकर वृद्धिंगत होऊ शकतो आणि त्यामुळे त्यांचे परतावे वेगाने वाढतात.
संरक्षण क्षेत्रातील चांगल्या कंपन्या गेल्याच आठवड्यात पंतप्रधानांनी संरक्षण क्षेत्रातील मोठ्या बदलांबद्दलचे सूतोवाच केलेय आणि याचा फायदा या क्षेत्रातील अनेक छोट्या कंपन्यांना होऊ शकतो.
भारत डायनॅमिक्स : भारत सरकारच्या अखत्यारीत असलेली व 1970 साली स्थापन झालेली ही कंपनी मिसाईल्स दारूगोळा बनवणारी अव्वल कंपनी आहे. आकाश मिसाईल, मिलन ही मिसाईल्स व वरुणास्त्रसारखे टॉर्पेडोदेखील हीच कंपनी बनवते व निर्यात करते. 8000 कोटी रु. बाजारमूल्य असलेली ही कंपनी असून मार्च 2020 अखेरीस संपलेल्या तिमाहीत त्यामागील तिमाहीच्या तुलनेत सुमारे तिप्पट उत्पन्न तर सहा पट निव्वळ नफा जाहीर केलेला आहे. ही कंपनी जवळपास ऋणमुक्त असून या कंपनीतील जवळजवळ 88 टक्के हिस्सा सरकारकडे आहे, तर एचडीएफसी म्युच्युअल फंडाने या कंपनीच्या शेअर्सची जोरदार खरेदी केली आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स : संरक्षण संप्रेषक उत्पादने, रडार्स, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, नौदल प्रणाली, इलेक्ट्रो ऑप्टिक्स, शस्त्रास्त्र प्रणाली इ. विविध गोष्टी ही कंपनी बनवते. ही कंपनी लार्ज व मिड कॅपच्या काठावर असून आपल्या सर्वोच्च भावाच्या जवळपास निम्म्या भावात उपलब्ध आहे. हीदेखील एक सरकारी कंपनी असून प्रामुख्याने एरोस्पेस आणि भारतीय सशस्त्र दलासाठी प्रगत इलेक्ट्रॉनिक उत्पादने तयार करते. 51 टक्के हिस्सेदारी सरकारकडे असून विविध म्युच्युअल फंडांच्या 124 योजनांमध्ये या कंपनीचे शेअर्स समाविष्ट आहेत. हीदेखील ऋणमुक्त कंपनी असून जून 2020 तिमाहीतील कर्जावरील व्याज हे जवळपास नगण्य आहे.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स : राफेल प्रकरणात या कंपनीस प्रसिद्धी मिळाली असून गेल्या तीन महिन्यांत ही कंपनी लार्जकॅप श्रेणीमध्ये दाखल झालीय. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ही एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी असून त्याचे मुख्यालय भारतातील बंगळुरू येथे आहे. हे भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या व्यवस्थापनात आहे. तेजस हे लढाऊ विमानदेखील हीच कंपनी बनवत असून रशियाच्या सुखोई
कॉर्पोरेशनसोबत 5ींह (फिफ्थ) जनरेशन लढाऊ जेट बनवण्यासाठी या कंपनीने 3500 कोटी अमेरिकन डॉलर्सचा करार केलेला आहे. तसेच बोईंगचे सुटे भाग, मिगसाठी लागणारे टर्बो पंखे हीच कंपनी बनवत असून एअरबस, हनीवेल, रुआग इ. कंपन्यांबरोबर या कंपनीचे करार आहेत. 90 टक्के हिस्सा सरकारकडे असून आयसीआयसीआय म्युच्युअल फंड व निप्पॉन इंडिया फंडाने या कंपनीचे लाखो शेअर्स खरेदी करून ठेवले आहेत. मार्च 2020च्या तिमाहीत कंपनीने त्यामागील तिमाहीतील नक्त नफ्यामध्ये अडीच पट वाढ दर्शविली आहे.
ऍस्ट्रा मायक्रोवेव्ह : ऍस्ट्रा मायक्रोवेव्ह संरक्षण, अवकाश, हवामानशास्त्र आणि दूरसंचारात वापरल्या जाणार्या व आरएफ आणि मायक्रोवेव्ह सिस्टमसाठी उप-प्रणाली डिझाइन करते, विकसित करते आणि बनवतेदेखील. केवळ 1100 कोटी रु. बाजारमूल्य असणार्या या कंपनीने मागील चार तिमाहींमध्ये चढत्या क्रमाने उत्पन्न कमावले आहे. 78 टक्के हिस्सा प्रवर्तकांकडे असून हे शेअर्स कोठेही तारण नाही ही कंपनीसाठी उजवी बाब आहे. तसेच ह्या कंपनीवरदेखील कमी कर्ज आहे.
बीईएमएल-आधीची भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड : हीदेखील सरकारी कंपनी असून संरक्षण, खाण व बांधकाम आणि रेल्वे मेट्रो या गोष्टींमध्ये ही कंपनी सेवा पुरवत आहे. रणगाडे वाहतुकीसाठी लागणारे ट्रेलर्स, रॉकेट लाँचर्स, विविध रिकव्हरी वाहने, प्रचंड मोठे एक्सकॅव्हेटर, अजस्त्र इलेक्ट्रिक डंपर्स, बुलडोझर्स, रेल्वेचे पॅसेंजर कोच, इन्पेक्शन कार्स, बीएफएटी वॅगन इ. गोष्टी बनवते, तसेच 68 देशांमध्ये निर्यातदेखील करते. या कंपनीचे बाजारमूल्य 3000 कोटी रु. पेक्षा कमी आहे. 54 टक्के हिस्सा सरकारकडे असून 20 टक्के म्युच्युअल फंडांकडे, 20 टक्के हिस्सा जनतेकडे, तर 5 टक्के हिस्सा हा इतर संस्थांत्मक गुंतवणूकदारांकडे आहे.
वरील कंपन्यांव्यतिरिक्त भारत फोर्ज, अशोक लेलँड यांसारख्या कंपन्यादेखील संरक्षण क्षेत्रासाठी कार्यरत आहेत, परंतु त्यांचे मुख्य व्यवसाय हे इतर क्षेत्रात मोडत असल्याने त्यांना या क्षेत्रासाठी गृहीत धरले नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यात जोखीम असल्याने वाचकांनी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा योग्य सल्ला घेऊनच शेअर बाजारातील गुंतवणूक करावी.
सुपर शेअर ः ऍक्सिस बँक
मागील आठवड्यात दररोज वाढलेला शेअर म्हणजे ऍक्सिस बँक. हा शेअर एका आठवड्यात सुमारे साडेपंधरा टक्के वाढला. आधीच खासगी बँकांमध्ये आलेली तेजी आणि त्यातच बँकेने जून तिमाही अखेरचे अपेक्षेपेक्षा उत्कृष्ट निकाल जाहीर केले. वर्षाच्या निकषावर बँकेचे नक्त व्याजाचे उत्पन्न 19.5 टक्के वाढलेय, तर मालमत्तेची गुणवत्तादेखील सुधारलीय. बँकेचे ग्रॉस एनपीए हे 1.4 टक्क्याने घटून 4.72 टक्क्यांवर आलेले आहेत, तर नक्त एनपीए हे केवळ 1.23% आहेत. तांत्रिकी आलेखानुसार 470-480 रु.च्या आसपास खरेदी केल्यास 430 हा स्टॉप लॉस गृहीत धरून 575 व 615 हे लक्ष्य ठेवता येऊ शकते. दीर्घ गुंतवणुकीसाठी पहिल्या तीन खासगी बँकांमध्ये ही बँक गृहीत धरून या बँकेमध्ये दीर्घ-मुदत ठेव करण्याऐवजी या बँकेच्या शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी उजवी ठरू शकते.
-प्रसाद ल. भावे. sharpadvisersgmail.com