Wednesday , February 8 2023
Breaking News

जसप्रीत बुमराह तंदुरुस्त; मुंबईला दिलासा

बेंगळुरू : वृत्तसंस्था

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे दोन संघ गुरुवारी (दि. 28) आयपीएलमध्ये भिडणार आहेत. दोन्ही संघाला 12 मोसमातील पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे बेंगळुरूत होणार्‍या या सामन्यात पहिल्या विजयाची चव चाखण्यासाठी रोहित शर्मा व विराट कोहली आतुर आहेत. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला आनंदाची बातमी मिळाली आहे. त्यांचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरला आहे आणि बेंगळुरूविरुद्ध मैदानात उतरण्यासाठी तयार आहे. त्यातच लसिथ मलिंगालाही श्रीलंकन मंडळाने आयपीएल खेळण्याची परवानगी दिल्यानं मुंबई इंडियन्सची बाजू भक्कम झाली आहे.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकात बुमराहच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे पुढील सामन्यांतील त्याच्या समावेशावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते. त्यात त्याचा वर्ल्डकप सहभागही धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मुंबई इंडियन्सने सोमवारी बुमराहची दुखापत गंभीर नसल्याचे सांगितले, परंतु बेंगळुरूत होणार्‍या सामन्यासाठी तो सोमवारी संघासोबत रवाना झाला नाही. वैद्यकीय मदतीनंतर बुमराह मंगळवारी बेंगळुरूत दाखल झाला आणि त्याने सहकार्‍यांसोबत कसून सरावही केला. त्यामुळे या सामन्यात बुमराह विरुद्ध कोहली असा सामना पाहायला मिळेल.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या अखेरच्या षटकात बुमराहच्या खांद्याला दुखापत झाली आणि तो मैदानावर कळवळत होता. डावाच्या अखेरच्या चेंडूवर दिल्लीच्या रिषभ पंतने मारलेला फटका झेलण्यासाठी बुमराहने डाईव्ह मारली आणि खांद्याला दुखापत करून घेतली. प्राथमिक उपचारानंतर बुमराह डगआऊटमध्ये गेला, परंतु तो फलंदाजीला आला नाही. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही मुंबई इंडियन्सकडून बुमराहच्या दुखापतीबाबत फार काही सांगण्यात आले नव्हते.

बुमराह मुंबईत असून संघाचे फिजीओ नितीन पटेल त्याच्यासोबत आहेत. बुमराह दुखापतीतून सावरत आहे आणि सुदैवाने त्याची दुखापत गंभीर नाही, असे मुंबई इंडियन्सकडून मंगळवारी सांगण्यात आले होते.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply