
पनवेल : वार्ताहर
आमदार प्रशांत ठाकूर गणेशोत्सव स्पर्धा मर्यादित कळंबोलीचे पारितोषिक वितरण रविवारी वसाहतीतील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात सामाजिक अंतर राखून करण्यात आले. रोडपालीचा राजाला आकर्षक मूर्ती म्हणून तर कोरोना विषयक प्रभावी जनजागृती करिता कळंबोली युथ क्लब आणि सामाजिक उपक्रमसाठी ओमकार मित्र मंडळाला गौरवण्यात आले. गेल्या वर्षीच्या शिस्तबद्ध मिरवणुकीसाठी स्वराज्य कला क्रिडा मंडळाला सन्मानित करण्यात आले.
कळंबोली परिसरात दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आकर्षक देखावे साकारले जातात. ते पाहण्यासाठी गणेश भक्त मोठ्या संख्येने गर्दी करतात. याव्यतिरिक्त मनमोहक श्रींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. सामाजिक उपक्रम सुधार राबवले जातात. या पार्श्वभूमीवर जनसेवक नितीन काळे दरवर्षी आमदार प्रशांत ठाकूर गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करतात. या माध्यमातून गणेश मंडळांना प्रोत्साहन दिले जाते. यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट होते. राज्य सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सप्रमाणे यंदा कळंबोलीत गणेशोत्सव साजरा करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश गायकवाड यांनी केलेल्या आवाहनानुसार यावेळी मंडप मुक्त गणेशोत्सव दिसून आला.
दरम्यान, नितीन काळे यांनी सालाबादप्रमाणे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावाने गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यानुसार संबंधित मंडळांचे परीक्षण करून त्यांना सन्मानित करण्यात आले. विजेत्या मंडळाचे नावे जाहिर करून त्यांना सन्मानचिन्ह, शॉल, नारळ देऊन आदरपूर्वक गौरविण्यात आले. या वेळी भाजपचे कळंबोली मंडल अध्यक्ष रवीनाथ पाटील, नगरसेवक अमर पाटील, भविआ जिल्हा अध्यक्ष बबन बारगजे, भविआ शहर अध्यक्ष आबासाहेब घुटुकडे, शहर उपाध्यक्ष दिलीप बिष्ट, युवा नेते जोहेब पटेल, युवा मोर्चाचे सरचिटणीस सिद्धेश राजेंद्र बनकर, पार्टी कार्यालयीन चिटणीस जगदीशजी खंडेलवाल उपस्थित होते.