Breaking News

कर्जतमध्ये जुगार अड्ड्यावर धाड

45 जणांना अटक; 38 लाखांचा ऐवज जप्त

कर्जत : बातमीदार
कर्जत शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर रायगड पोलिसांनी धाड टाकून 45 जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. या ठिकाणाहून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम आणि वाहने असा 38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये रायगडसह मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे व नाशिकमधील जुगारींचा समावेश आहे.
कर्जत शहरातील विठ्ठलनगर येथील राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते भगवान भोईर यांच्या मालकीच्या बंद कार्यालयात अनधिकृत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशान्वये वडखळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अजित शिंदे, सहाय्यक फौजदार पिंगळे, हवालदार धूपकर, नाईक म्हात्रे, तसेच कर्जत पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार दिनेश पाटील, शिपाई बेंद्रे, केंद्रे, वडखळ आरसीपी प्लाटून नंबर एकमधील पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने रविवारी (दि. 30 ऑगस्ट) पहाटे छापा टाकून कारवाई केली. त्या वेळी तेथे पाच टेबलभोवती खुर्च्यांवर बसून काही इसम तीन पत्ती जुगाराचे डाव खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या सर्व जुगार्‍यांच्या मुसक्या आवळल्या.
या कारवाईत 45 जणांना अटक करण्यात आली असून, जुगार खेळण्याकरिता वापरण्यात येणार्‍या साहित्यासह सात लाख 64 हजार 780 रुपयांची रोख रक्कम तसेच नऊ वाहने असा एकूण 38 लाख 64 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक केलेल्या 45 जणांमध्ये 43 पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. पकडण्यात आलेले जुगारी मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे आणि रायगड जिल्ह्यातील असून, काही कर्जत तालुक्यातीलदेखील आहेत. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गावडे अधिक तपास करीत आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply