निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा टोला
मुंबई ः प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा किमान एकतरी उमेदवार विजयी झाला, पण शिवसेनेच्या हाती मात्र काहीही लागले नाही. त्यांचा एकही उमेदवार जिंकला नाही. तीन पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांच्या शक्तीचा अंदाज आम्हाला आला नाही हे खरं, परंतु या तीन पक्षांतील केवळ दोघांनाच या निवडणुकीत फायदा झाला आणि एका पक्षाला मात्र एकही जागा मिळाली नाही. राज्यात मुख्यमंत्री असलेल्या शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही ही गंभीर बाब असून त्यांनी आता आत्मचिंतन करावे, असा टोला माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे.
विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकांमध्ये विजयासाठी आसुसलेल्या महाविकास आघाडीला यश मिळाले. राष्ट्रवादीचे चार, तर काँग्रेसच्या एका उमेदवाराच्या विजयासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी सहापैकी पाच जागा जिंकल्या. भाजपनेही धुळे-नंदुरबारची जागा जिंकली. या निवडणुकीत शिवसेनेची पाटी मात्र कोरीच राहिली. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.
चंद्रकांत पाटील यांचे महाविकास आघाडीला आव्हान
दरम्यान, विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकांनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आव्हान दिले आहे. निकालात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. तीन पक्ष एकत्र येऊन एकाशी लढल्यावर वेगळे चित्र निर्माण होत नाही. तरी आम्ही चांगला संघर्ष करून निकराचा लढा दिला. या निकालांत शिवसेनेला काय मिळाले याचा त्यांनी विचार करावा. त्यांची अमरावतीची जागा गेली. राष्ट्रवादीचा मात्र फायदा झाला. पुणे पदवीधर, मराठावाडा पदवीधर व अप्रत्यक्षरीत्या अमरावती शिक्षक मतदारसंघात त्यांना विजय मिळवता आला. मी या तिघांना आव्हान देतो की तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही एकएकटे लढा, पण त्यांच्यात ती हिंमत नसल्याचे साफ दिसते, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.