पेण ः प्रतिनिधी
मागील पाच-सहा महिन्यांतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जारी करण्यात आले होते. यामुळे जिल्ह्यातील अनेक तरुणांना आपली नोकरी गमवावी लागली असून यामध्ये पेण तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे.
मागील 10 वर्षांत पेणमधील अवस्था बिकट झाली आहे. बहुतांश कंपन्यांमध्ये कायमस्वरूपी भरती प्रक्रिया बंद आहे. ज्या नोकर्या सद्यस्थितीत उपलब्ध आहेत, त्या तुटपुंज्या पगाराच्या व कंत्राटी पध्दतीच्या असल्याने त्या नोकर्यांची कोणत्याही प्रकारची शाश्वती नाही. त्यामुळे पदवी घेऊनही नोकरी नाही अशी बिकट अवस्था येथील सुशिक्षित तरुणवर्गाची झाली आहे.
पेणमधून अनेक तरुण पनवेल, रसायनी, ठाणे, वाशी, मुंबई या ठिकाणी कामाला जात असून सकाळी 6 किंवा 7 वाजताची रेल्वेसेवा तसेच एसटी सेवा या नोकरदारांना अतिशय उपयुक्त ठरत होती, परंतु लॉकडाऊनच्या काळात ही सेवा मागील पाच- सहा महिन्यांपासून बंद असल्यामुळे नोकरवर्गाला जाण्यासाठी साधन नसल्यामुळे अनेक तरुणांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागले आहे. काहींना कंपनीच्या वतीने वर्क फ्रॉम होम देण्यात आले होते, परंतु ज्यांना कामाच्या ठिकाणी जाणे अनिवार्य होते, त्या कामगारवर्गाला नोकरीच्या ठिकाणी जाणे शक्य नसल्यामुळे अनेक तरुण आता बेरोजगार झाले आहेत. अशा तरुणांना शासनाने स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारतसारख्या महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत, परंतु त्याची पुरेशी माहिती नसल्यामुळे येणार्या काळात या योजनांच्या जनजागृतीसाठी प्रशासकीय पातळीवर आणि समाजसेवी संघटनांकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. पेणमधील सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेता स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्यक्रम दिला जाणे गरजेचे आहे. तसेच सुशिक्षित तरुणांनीही आता येणार्या कठीण काळाचे आव्हान स्वीकारून व्यवसायाभिमुख होण्याची गरज आहे.