कर्जत ः बातमीदार
मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे या मेन लाइनवरील नेरळ रेल्वे स्थानकाबाहेर असलेले फाटक 4 ते 6 सप्टेंबर या कालावधीत बंद असणार आहे. याबाबत मध्य रेल्वेने पत्रक काढून जाहीर सूचना केली आहे. फाटक बंद राहणार असल्याने नेरळच्या पलीकडे असलेल्या शेकडो वाहनांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार असून हा मार्ग गाड्यांना काही किलोमीटरचा फेरा मारण्यास भाग पाडणार आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर नेरळ-कर्जत स्थानकांदरम्यान असलेले मुंबईवरून 86 किलोमीटर अंतरावर गेट नंबर 21 आहे. हे फाटक नेरळ ग्रामपंचायत हद्दीत येत असून नेरळ रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर लोकवस्तीत हे फाटक आहे. कर्जत तालुक्याचा अर्धा भाग असलेल्या कशेलेपासून कळंबपर्यंतच्या 100हून अधिक गावांतील लोक नेरळ गावात येण्यासाठी या फाटकाचा वापर करतात. त्यामुळे या फाटकातून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे या फाटकातील मध्य रेल्वेच्या रुळांची दुरुस्ती सातत्याने करावी लागत असते. वाहनांच्या वर्दळीमुळे मार्गावरील रुळाच्या दुरुस्तीऐवजी रुळामध्ये असलेला रस्ता सुस्थितीत असावा यासाठी मध्य रेल्वेकडून फाटक बंद करून दर दोन वर्षांनी दुरुस्तीची कामे केली जातात. त्याच स्वरूपातील अभियांत्रिकी काम करण्यासाठी 4 ते 6 सप्टेंबर या कालावधीत नेरळ स्थानकापासून काही अंतरावर असलेले नेरळ फाटक बंद राहणार आहे.