Sunday , October 1 2023
Breaking News

उपोषणाच्या इशार्यानंतर जिल्हा परिषदेला जाग

नांदगाव प्राथमिक शाळेच्या इमारत दुरुस्तीसाठी निधीची तरतूद

मुरुड : प्रतिनिधी

इमारत नादुरुस्त झाल्यामुळे मुरुड तालुक्यातील नांदगाव प्राथमिक शाळा गेल्या तीन वर्षांपासून बंद असून, या शाळेतील सुमारे 150 विद्यार्थ्यांना दुसर्‍या ठिकाणी बसवून शिकविले जात आहे. अनेकांनी मागणी, पत्रव्यवहार करुनही रायगड जिल्हा परिषद या शाळा इमारतीची दुरुस्ती करण्याकडे लक्ष देत नव्हती. मात्र या शाळेच्या दुरुस्तीसाठी उपोषण करण्याचा इशारा देताच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला खडबडून जाग आली.

जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून मंजूर करण्यात आलेल्या निधीतून या शाळेच्या इमारत दुरुस्ती करण्याच्या सूचना मुरुडच्या गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. नांदगाव येथील प्राथमिक शाळा नबाबकालीन असून, 1961 पासून तिचा वापर रायगड जिल्हा परिषद करीत आहे. या शाळेत मराठी आणि उर्दू भाषेचे वर्ग भरत होते. मात्र भिंतींना तडे गेल्याने आणि छप्पर नादुरुस्त झाल्याने 2016 पासून ही शाळा आजतागायत बंद आहे. या शाळेतील सुमारे 150 विद्यार्थ्यांना दुसर्‍या ठिकाणी बसवून शिकविले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या शाळेची दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी अनेकांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र त्याची दखल घेतली जात नव्हती. मनसेचे मुरूड तालुका अध्यक्ष शैलेश खोत आणि माजी तालुका अध्यक्ष अरविंद गायकर यांनी 26 मार्चपासून उपोषणाला बसणार असल्याचे पत्र 7 मार्च 2019 रोजी दिल्यानंतर जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग खडबडून जागा झाला. नांदगाव शाळेतील विद्यार्थ्यांना अध्यापनाच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून दोन लाख तीस हजार रुपये मंजूर करण्यात आले असून, या निधीतून दोन वर्ग खोल्याची इमारत दुरुस्त करण्यासाठी मुरूडच्या गटविकास अधिकारी राजनंदिनी भागवत आणि गटशिक्षणाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शैलेश खोत यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

Check Also

रायगडात अन्न व औषध प्रशासनाचे धाडसत्र

26 लाख 81 हजारांच्या माल जप्त; परवाना रद्दचीही कारवाई पेण ः प्रतिनिधी गणेशोत्सवादरम्यान सर्व पदार्थ …

Leave a Reply