कर्जत : बातमीदार
हाळ बुद्रुक येथे खालापूर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत कत्तलीसाठी आणलेल्या 5 जनावरांना वाचविण्यात यश आले असून, या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. तर एका जनावराची कत्तल करून त्याचे मांस विक्रीसाठी घेऊन जाण्याकरिता आलेला दलालदेखील पोलिसांच्या ताब्यात आला आहे. खोपोलीनजीकच्या हाळ बुद्रुक येथील हयात जळगावकर आणि मुजीब जळगावकर यांच्या घराच्या मागे असलेल्या पडवी काही जनावरे आणून ठेवली असल्याची खबर 22 मार्च रोजी खालापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार, तसेच म्हात्रे, शेडगे, पवार, खंडागळे, नरुटे, सावरटकर यांनी रात्री खासगी गाडीने हाळ बुद्रुक गावातील हयात जळगावकर यांचे घर गाठले. त्यावेळी घराच्या मागे असलेल्या पडवीत पोलिसांना तीन इसम दिसले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच त्यातील एक इसम पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनी त्या पत्र्याचा शेड असलेल्या जागेत प्रवेश करून गोवंश मांस, जनावरांचे शिंग, मुंडके, इतर अवयव यांच्यासह वजनकाटा, मापे, मांस कापण्याची हत्यारे आदी साहित्य ताब्यात घेतले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड यांना बोलावून त्यांना ते मांस तपासणीसाठी घेण्याच्या सूचना दिल्या. ते मांस पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. यावेळी पाच जनावरांची सुटका केली असून, त्यात एक गाय, एक बैल आणि तीन वासरांचा समावेश आहे.त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची रवानगी आसूडगाव (ता. पनवेल) येथील गोशाळेत केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शेख महोमद, जाफर महुमद सय्यद आणि हयात जळगावकर तसेच पळून गेलेला त्याचा मुलगा मुजीब जळगावकर या चौघांवर गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटक केली आहे.