
कर्जत : प्रतिनिधी
अपघातग्रस्तांना मदत करणार्यांना कोणताही त्रास होणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे रस्ता अपघातात सापडलेल्यांना तातडीने मदत करण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पनवेल येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटर वाहन निरीक्षक गजानन ठोंबरे यांनी कर्जत येथे केले. कर्जत येथील कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालय, समर्थ मोटर ट्रेनिंग स्कूल आणि पनवेल येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने फार्मसी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. मोटर वाहन निरीक्षक निलेश धोटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलित करून समारंभाची सुरुवात करण्यात आली. या वेळी झालेल्या कार्यक्रमात मोटर वाहन निरीक्षक ठोंबरे बोलत होते. प्राचार्य डॉ. मोहन काळे आणि अभिजित यांनी उपस्थितांचे स्वागत केले. स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य विजय मांडे यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांनी आतापासूनच शिस्त व नियम पाळण्याची सवय केली पाहिजे, असे ते म्हणाले. मोटर वाहन निरीक्षक धनराज शिंदे यांनी वाहतुकीचे नियम समजावून सांगितले. पोलीस निरीक्षक अरुण भोर, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रियांका बांदिवडेकर यांनी केले. नगरसेविका विशाखा जिनगरे, स्वामिनी मांजरे, मोटर वाहन निरीक्षक विवेक देवखिले, संजय गायकवाड, निलेश मराठे, वाहतूक पोलीस सुरेश पाटील, निलेश गायकवाड, प्रा. प्रीतम जुवाटकर, प्रा. पूनम पाटील, डॉ. भरत टेकाडे, प्रा. अमोल चांदेकर, प्रा. अजय खर्चे, प्रा. निलेश गोर्डे, सुहास गुप्ते, महेश म्हात्रे, निशिकांत मोधळे आदींसह शिक्षक, विद्यार्थी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. विवेक भागवत यांनी आभार मानले.