लाखो रुपयांचे नुकसान, कुंड्यांमधील झाडे गायब
पनवेल : बातमीदार
नवीन पनवेल ते खांदा कॉलनी शहराला जोडणारा उड्डाणपूल बांधण्यासाठी सिडकोने लाखो रुपये खर्च केले. त्यामुळे तासन्तास रेल्वेच्या बंद फाटकाजवळ थांबणार्या वाहनचालकांना दिलासा मिळाला. वाहतूक कोंडी देखील कमी झाली, मात्र या उड्डाण पुलावरील दुभाजकावर लावलेल्या झाडांकडे सिडकोचे दुर्लक्ष होताना दिसत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. येथील झाडे सुकली आहेत.कुंड्यांमधील झाडे गायब झलेली आहेत.
नवीन पनवेल ते खांदा कॉलनीला जोडणार्या उड्डाणपुलावर सिडकोने काही वर्षांपूर्वी झाडे लावली होती. त्यासाठी एका ठेकेदाराला ठेका दिला होता, मात्र त्या ठेकेदाराने झाडांकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे झाडे उन्हात करपून मेली आहेत. काही झाडांना पाणी न घातल्यामुळे येथील झाडे सुकून गेली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सिडकोने या उड्डाण पुलावर झाडे लावण्यासाठी कुंड्या उभारून त्यात झाडे लावली. त्यासाठी लाखो रुपये या झाडांवर खर्च केले आहेत, मात्र यापूर्वीची लावलेली झाडे जगवता आली नाहीत, तर या कुंड्यातील झाडे जगतील का, असा सवाल येथील रहिवासी विचारत आहेत.
नवीन पनवेल व खांदा कॉलनी शहराला जोडणार्या उड्डाणपुलावरील सर्वच झाडे सुकून गेली आहेत, मात्र सिडको याकडे डोळेझाक करत आहे. काही वर्षापूर्वी याच उड्डाणपुलावरील दुभाजकांवर झाडे लावण्यात आली होती, मात्र काही दिवसांतच ही झाडे करपून गेली. त्यांची योग्य ती देखभाल न घेतल्यामुळे आता पुन्हा लाखो रुपये खर्च करून झाडे लावावी लागणार आहेत. याच उड्डाणपुलावर झाडे जगवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे असे जवळपास 15 फलक सिडकोकडून लावले गेले होते, मात्र ते संदेश फलक देखील गायब झाले आहेत. या संदेश फलकांची देखील पायमल्ली होताना दिसत आहे. उड्डाणपुलाच्या मधोमध लावलेली सर्व लहान झाडे उन्हामुळे करपून गेली आहेत. या पूर्वी लावलेल्या झाडांची योग्य ती काळजी घेतली असती व त्यांना व्यवस्थित पाणीपुरवठा केला असता, तर पुन्हा होणारा खर्च वाचला असता. त्यामुळे येथील झाडांवर वारंवार पैशाचा अपव्यय होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.