पनवेल : बातमीदार – कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना अवाजवी बिले आकारण्याच्या तक्रारी अजूनही येत आहेत. रुग्णांना उपचारासाठी आकारल्या जाणार्या बिलाच्या तक्रारी निवारण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष लेखा परीक्षण समिती उभारण्यात आली आहे. मात्र आत्ता या तक्रारीसाठी विशेष 12 तास कॉल सेंटर सुरू करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत कोरोनावर उपचार करणारी 10 मोठी खासगी रुग्णालये आहेत. काही दिवसांपूर्वीच शहरातील या दहा रुग्णालयांबाबत महापालिकेकडे बिलाबाबत तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार या दहा रुग्णालयांना पालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र त्यानंतरही शहरातील रुग्णालयांच्या तक्रारी कमी झालेल्या नाहीत. रुग्णालयांच्या बाबतीत येणार्या या तक्रारी निवारण्यासाठी पालिकेने विशेष लेखा परीक्षण समिती स्थापन केली आहे.
या समितीकडे आजवर अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे आता यापुढे लेखा परीक्षण समितीच्या अंतर्गत रुग्णालयांच्या वाढीव बिलांच्या तक्रारी आणि माहितीसाठी पालिकेच्या वतीने 12 तास कॉल सेंटर सुरू केले जाणार आहे. सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत हे कॉल सेंटर सुरू राहणार आहे. यासाठी एक हॉटलाइन नंबर दिला जाणार आहे. त्याची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आहे. लवकरच तक्रारीसाठी सुविधा सुरू होणार आहे.
रुग्णालयाच्या बिलासंदर्भात जर कुणाची काही तक्रार असेल तर त्यांना त्यांचं बिलाची प्रत प्रत्यक्षात आणून देण्याची हि गरज नसणार आहे मेलवर किंवा व्हॉट्सअॅपवरही तक्रार करता येणार आहे. शहरातील दहा रुग्णालयांना आत्तापर्यंत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र या पुढे एकाच रुग्णालयाच्या बाबतीत एकाच प्रकारची तक्रार येत राहिल्यास थेट कारवाई केली जाणार आहे.
रुग्णांकडून येणार्या तक्रारीनुसार रुग्णालयात त्याची शहानिशा केली जाते आणि अतिरिक्त बिल आकारले असल्यास रुग्णालयांना ते कमी करायला सांगून योग्य तेच बिल दिले जाते. आतापर्यंत अनेक रुग्णांना बिले कमी करून देण्यात आली आहेत. त्यामुळे तक्रारी करण्यास सोयीचे व्हावे म्हणून 12 तास कॉल सेंटर सुरू केले जात आहे.
-सुजाता ढोले, अध्यक्ष, लेखा परीक्षण समिती