नजीकच्या भविष्यात शेअरबाजार वर जाईल की खाली येईल, हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे चांगले शेअर घेवून शांत बसणे, हेच गुंतवणूकदारांच्या हिताचे आहे. अशा गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओत असाव्यात, अशा आणखी पाच चांगल्या कंपन्या…
सध्या शेअरबाजाराबद्दल दोन प्रकारची मतं समोर येताना दिसत आहेत. प्रामुख्यानं म्हणजे शेअरमार्केट पुन्हा एकदा कोसळेल अथवा एकदा खाली येईल असं अनेक बाजारातील जाणकार ठामपणे सांगत आहेत. तर दुसरीकडं असा सूर उमटताना दिसतोय की, शेअरबाजारातील निर्देशांक लवकरच नवीन उच्चांक गाठतील.. आता अशा वातावरणात नव्या गुंतवणूकदारानं काय करायचं? तर निवडक कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी त्यांच्या योग्य भावात करायची. मागील काही लेखात आपण काही कंपन्यांबद्दल पाहिलं, आता या लेखात देखील काही मिडकॅपकंपन्या सुचवत आहे.
अवंती फीड्स : ही कंपनी कोळंबी व मत्स्य खाद्य आणि झिंग्यांवर प्रक्रिया करून ते निर्यात करणारी भारतातील आघाडीची निर्माती आहे. या कंपनीनं थाई युनियन फ्रोजन प्रोडक्ट्स पीसीएल सह संयुक्त उद्यम स्थापित केले आहे, जे जगातील सर्वात मोठी सीफूड प्रोसेसर आणि थायलंडमधील कोळंबी व मत्स्य खाद्य उत्पादन करणारे अग्रगण्य निर्माते व हॅचेरीपासून झींगा व मासे प्रक्रिया व निर्यात या सर्व प्रकारच्या सुविधेनं परिपूर्ण आहेत.
बाजारमूल्य : 6500 कोटी रु.
विक्रीवृद्धी दर : 16.3 (मागील तीन वर्षांची सरासरी)
सरासरी लाभांश 17%
बजाज इलेक्ट्रिकल्स : पुण्याच्या नामवंत अशा बजाज समूहातील एक हिस्सा असणारी ही कंपनी त्यांच्या ज्युसर, इलेक्ट्रिक किटली, टोस्टर, सँडविचमेकर, इलेक्ट्रिक कुकर, इंडक्शन प्लेट, मायक्रोवेव्ह अवन, मिक्सर-ग्राईंडर्स, फूड प्रोसेसर्स निर्लेप उत्पादनं इ. पासून रूम हीटर्स, एअर कुलर्स, वॉटर हीटर्स, इस्त्री, पंखे, एलईडी बल्ब्स अशा घरगुती उपकरणांमुळं सर्वांच्याच परिचयाची आहे. त्याखेरीज घराबाहेरील प्रदीपन प्रणाली व सौर्य-प्रदीपन, वीज वितरण व प्रसारण या सर्व व्यवसायांमध्ये कंपनीचा बोलबाला आहे. 2016 पासून 2020 पर्यंत कंपनीचा कॅशफ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी 305 कोटी रुपयांवरून 626 कोटी रुपये झालेला आहे जी बाब उजवी ठरत आहे.
बाजारमूल्य : 5200 कोटी रु.
विक्रीवृद्धी दर : 5.43 (मागील तीन वर्षांची सरासरी)
सरासरी लाभांश : 21%
कॅनफिन होम्स : घरकर्ज पुरवणारी ही कंपनी असून सरकारी अखत्यारीतील कॅनरा बँकेची उपकंपनी आहे. घरकर्ज, टॉपअप कर्ज यांखेरीज कंपनी तारणकर्ज, व्यावसायिक मालमत्तेसाठी कर्ज, विकसनासाठी साईट लोन, वैयक्तिक कर्ज, मिळणार्या भाडे रक्कम समोर उचल (कर्ज), मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज व ’निश्चिंत’ नावानं पेन्शनर लोकांसाठी देखील कर्ज ही कंपनी उपलब्ध करून देते.
बाजारमूल्य : 5000 कोटी रु.
विक्रीवृद्धी दर : 14.5 (मागील तीन वर्षांची सरासरी)
सरासरी लाभांश 13%
दीपक नायट्राईट : रंग व रंगद्रव्यं, ऍग्रोकेमिकल्स, कृषीरसायनं, औषधनिर्मिती, इंधन उत्पादन मिश्रित, रबर, कागद, कीटकनाशकं, वैयक्तिक प्रसाधनं आदी व्यवसायात लागणारी पूरक रासायनिक गोष्टी ही कंपनी पुरवते. कंपनीची भारतात पाच ठिकाणी प्लांट असून जगातील फॉर्च्युन 500 मधील कंपन्यांशी या कंपनीची भागीदारी आहे. प्रामुख्यानं कंपनी दीपक नायट्राईट व दीपक फेनॉलिक्स या दोन प्रकारात व्यवसाय करते. भारतातील कंपनीचा फेनॉल-ऍसिटोनचा प्लांट हा जागतिक दर्जाचा असून जागतिक तापमानवाढीच्या दृष्टीनं देखील अव्वल आहे.
बाजारमूल्य : 10250 कोटी रु.
विक्रीवृद्धी दर : 45.5 (मागील तीन वर्षांची सरासरी)
सरासरी लाभांश 17.6 %
डिक्सॉन टेक्नॉलॉजीज : इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील ही कंपनी असून आत्मनिर्भर भारत व चीनच्या वस्तूंवरील जागतिक बहिष्कार हा या कंपनीच्या पथ्यावरच पडणार आहे. कंपनी जगभरातील ग्राहकांना ग्राहकपयोगी वस्तू (कंझ्युमर ड्युरेबल्स), घरगुती उपकरणे, प्रकाशयोजना, मोबाइल फोन आणि सुरक्षा उपकरणांचे डिझाइन बनवण्यासाठी सुविधा पुरवते. तसेच सेट टॉप बॉक्स, मोबाइल फोन, मेडिकल इलेक्रॉनिक्स आणि एलईडी टीव्ही पॅनेल्ससह विविध उत्पादनांच्या दुरुस्ती व नवीकरण सेवादेखील पुरवते. सॅमसंग या अग्रणी कंपनीचे फोन हे हीच कंपनी बनवते. याखेरीज लवकरच कंपनी स्वनिर्मित मोबाइल फोनच्या निर्मितीत उतरणार आहे, असं कंपनीनं जाहीर केलंय.
बाजारमूल्य : 10900 कोटी रु.
विक्रीवृद्धी दर : 21.4% (मागील तीन वर्षांची सरासरी)
नफावृद्धी दर : 59.4% (मागील पाच वर्षांची सरासरी)
सरासरी लाभांश उत्पन्न : 5 % या कंपन्यांची निवड मी माझ्या अभ्यासाने केली आहे. ज्याप्रमाणं जेवणांत कोणत्याही डिशची प्रत्येकाची रुचि जशी निरनिराळी असते अगदी पाणीपुरी देखील कोणाला तिखट, कोणाला गोड तर कोणाला मध्यम आवडते त्याचप्रमाणं गुंतवणूक करताना आपलं उद्दिष्टं व रुचि हे वेगवेगळं असू शकतं आणि म्हणूनच गुंतवणूक करताना आपल्या रुचि, पसंतीनुसार आपल्या वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराशी विचारविमर्श करूनच त्या कंपन्यांच्या शेअर्सना हात घालावा.
सुपरशेअर : ज्युबिलंट फूड वर्क्स
पिझ्झा व चायनीज म्हटलं की भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि त्यातूनच तो जर अव्वल असेल तर मग बात ही कुछ और! संपूर्ण लॉकडाऊनमध्ये केवळ एकच अन्नपदार्थ बाहेरून मागवता येत होता तो म्हणजे डॉमिनोज पिझ्झा. पिझ्झ्यामध्ये जगातील अव्वल असलेली कंपनी म्हणजे डॉमिनोज, आणि ज्युबिलंट फूड वर्क्स लिमिटेड ही नोएडा, उत्तर प्रदेशमधील एक भारतीय खाद्य वितरण कंपनी आहे जी भारत, नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशातील डॉमिनोज पिझ्झा आणि तसेच भारतातील डन्किन डोनट्सची मास्टर फ्रँचायझी आहे. ही कंपनी जुबिलेंट भारतीय या समूहाचा एक भाग आहे. याखेरीज हाँग्ज किचन नावानं कंपनी आपला स्वतःचा चायनीज पाककृतींसाठीचा ब्रँड विकसित करत आहे. आशियातील प्रमुख देशांकडून प्रेरित चिनी खाद्यपदार्थ व जोडीला अधिक चवदार अनुभवासाठी स्थानिक घटक असं अफलातून कॉम्बिनेशन या किचन रेस्तराँमध्ये असणार आहे. या रेस्तराँची खासियत म्हणजे व्हेज व नॉनव्हेज पदार्थ बनवताना त्यासाठी लागणारे पदार्थ, साहित्य व अगदी भांडीकुंडी देखील वेगवेगळी ठेवली व वापरली जातात. अजून एक दिलचस्प बात म्हणजे आपली आवडती डिश आपण बनताना पाहू शकतो. कंपनी वीसेक प्रकारात पिझ्झ्यामधील व्हरायटी पेश करते व सर्वांनाच माहिती आहे की, डॉमिनोजच्या पिझ्झ्याची डिलिव्हरी 30 मिनिटांत न मिळाल्यास 300 रुपयांपर्यंतचा पिझ्झा मोफत मिळतो, याचाच अर्थ हे लोक तुमचा पिझ्झा ठरल्या वेळेतच पुरवतात व लोकांच्या मूडची काळजी घेतात. अशा या कंपनीचा शेअर नवीन 52 आठवडी उच्चांक नोंदवून मागील आठवड्यातील सुपरशेअर ठरला. संपूर्ण जगात लॉकडाऊन नंतरही कंपनीनं सुमारे 15% विक्रीवृद्धीदर जोपासला आहे तर मागील पाच वर्षांतील नफ्याचा वृद्धीदर हा 22% आहे. मुख्य म्हणजे भारतात आजतरी या कंपनीचा कोणी स्पर्धक नाहीय. पिझ्झा रोजचं जेवण होऊ शकत नाही हे खरं असलं तरी कधीतरी पार्टीसाठी याचीच डिलिव्हरी योग्य ठरते, त्याचप्रकारे या कंपनीचं आपल्या पोर्टफोलिओमध्ये स्थान असण्यास हरकत नसावी.
-प्रसाद ल. भावे. (9822075888), sharpadvisers@gmail.com