पेण ः प्रतिनिधी
कणे ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या वेळी निवडणुकीत एका सदस्याचे मत बाद झाल्यानंतर सात सदस्यांपैकी सहा सदस्यांची सहा मते अशा प्रकारे दोन पक्षांच्या चार उमेदवारांना प्रत्येकी तीन-तीन मते मिळाली. या वेळी ही निवडणूक बरोबरीत झाल्यावर अधिकारी डी. एस. साळुंखे यांनी चिठ्ठी काढून निर्णय घेण्यास सांगितले. या वेळी शाळकरी विद्यार्थी सर्वेश म्हात्रे याने चिठ्ठी काढली. त्यात भाजपच्या दोन्ही उमेदवारांचे भाग्य उजळले. सरपंचपदावर कुणाल प्रभाकर पाटील, तर उपसरपंचपदासाठी प्रमिला भगवान म्हात्रे यांच्या नावाची चिठ्ठी निघाली आणि भाजप उमेदवार विजयी घोषित करण्यात आले. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे भाजप व मित्रपक्षाकडे बहुमत नसतानादेखील समसमान मते पडल्याने हा विजय साकार झाला. विरोधी गटाकडे चार मते असतानाही त्यांचे एक मत बाद झाल्यानंतर सरपंचपदाचे उमेदवार कुणाल पाटील व विरोधी गटाचे उमेदवार धिरज पाटील (शिवसेना) यांना प्रत्येकी तीन-तीन मते मिळाली. उपसरपंचपदाचे उमेदवार प्रमिला म्हात्रे व चंद्रहास पाटील यांनाही तीन-तीन मते मिळाली. निवडणूक समान झाल्यानंतर भाग्यवान विजेत्यांत भाजपच्या दोन्ही उमेदवारांचे नशीब उजळले. सरपंचपदावर कुणाल पाटील, तर उपसरपंचपदासाठी प्रमिला म्हात्रे यांची निवड झाली. या निवडणुकीसाठी मोहन पाटील, पंच कमिटी अध्यक्ष शांताराम भोईर, भगवान म्हात्रे, माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील, नारायण भोईर, सुभद्रा म्हात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. या वेळी सरपंच कुणाल पाटील व उपसरपंच प्रमिला म्हात्रे यांचे भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, वढाव सरपंच पूजा पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष रविकांत म्हात्रे यांनी अभिनंदन केले.