पेण ः प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले, तसेच राज्यातील अनेक पत्रकारांनाही आपला प्राण गमवावा लागला. त्यामुळे पत्रकारांच्या मागणीनुसार प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी पेणच्या पत्रकारांची अँटिजेन टेस्ट करण्याची सूचना संबंधित अधिकार्यांना दिली होती. त्यानुसार पेणमधील 25 ते 30 पत्रकारांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली.
संतोष पवार यांच्यासारखा प्रसंग कोणावर येऊ नये यासाठी पेणमधील पत्रकारांनी प्रांताधिकारी इनामदार यांची भेट घेऊन परिस्थितीचे गांभीर्य सांगितले. इनामदार यांनी आरोग्य यंत्रणेला पेणमधील सर्व पत्रकारांची अँटिजेन टेस्ट करण्याचे आदेश दिले तसेच जे पत्रकार पॉझिटिव्ह येतील यांच्या परिवाराचीही अँटिजेन टेस्ट करण्याचे आणि पुढील उपचारासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. याकामी डॉ. अभिजित पाटील, डॉ. प्रभाकर सोनावणे, लॅब टेक्निशियन विशाल महाजन, सीएचओ डॉ. तेजस्विनी म्हात्रे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या वेळी पत्रकारांनी दिवंगत संतोष पवार यांना श्रद्धांजली वाहिली.