Breaking News

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?

वैश्विक महामारी कोरोनामुळे भारतात सर्वाधिक प्रभावित राज्य म्हणून महाराष्ट्राचा क्रमांक अव्वल आहे. राज्यात दररोज मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळत असून, अनेकांचा बळीदेखील जात आहे. अशा वेळी या संकटावर सर्व लक्ष केंद्रित करणे आवश्यक असताना महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष शिवसेनेचे भलतेच कारनामे सुरू आहेत.

भाजपच्या हाती ऐनकेन प्रकारे सत्ता गेली तर आपले अस्तित्व धोक्यात येईल हे पाहून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र घेऊन महाराष्ट्रात सरकार बनविले आणि सोबतच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची हौस पूर्ण करून घेतली. सरकार चालविणे म्हणजे केवळ सवंग घोषणा करणे आणि मिळेल त्याचे श्रेय लाटणे नव्हे; तर आलेल्या अपयशाचीही जबाबदारी घेणे लोकशाहीत अभिप्रेत असते, पण याचे भान महाविकास आघाडी सरकारला विशेषत: शिवसेनेला राहिलेले नाही. त्यामुळेच शिवसेनेकडून नवनवे प्रताप पहावयास मिळत आहेत. अभिनेत्री कंगना राणावतप्रकरणी मुंबई महानगरपालिकेने सुडबुद्धीने केलेल्या कारवाईमुळे शिवसेनेवर टीका होत असतानाच, शिवसैनिकांनी नौदलाच्या माजी अधिकार्‍याला मारहाण केल्याचा धक्कादायक व निंदनीय प्रकार समोर आला आहे. कंगनाने मुंबईविषयी केलेले वक्तव्य निश्चितच समर्थनीय नाही. तिने बोलताना भान बाळगायला हवे होते, पण शिवसेनेचाही तोल गेला. कंगनाने जर अनधिकृत बांधकाम केले आहे, तर तिच्यावर कायदेशीर मार्गाने कारवाई करता आली असती. ती ऐकत नसेल तर न्यायालयाचे दरवाजेही ठोठावता आले असते, मात्र उतावीळ शिवसेनेने थेट तिच्या कार्यालयात तोडफोड केली. मुंबईत एवढी अनधिकृत बांधकामे आहेत, पण त्यांच्यावर इतक्या तत्परतेने कारवाई होत नाही. त्यामुळेच कंगनाला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळताना दिसत आहे. कंगना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला असताना काही शिवसैनिक मिळून एका माजी नौदल अधिकार्‍याला मारहाण करीत असल्याचे समोर आले. कारण काय तर या अधिकार्‍याने म्हणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगात्मक चित्र प्रसारित करून बदनामी केली. ही म्हणजे गुंडगिरीच झाली. स्वत: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र काढण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक बड्या नेत्यांची व्यंगचित्रे काढली. म्हणून काय कुणी बाळासाहेबांना लक्ष्य केले नाही. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. सामनात सातत्याने व्यंगचित्रे प्रसिद्ध होत असतात. मग ज्यांच्यावर ती प्रसिद्ध होतात त्यांनीसुद्धा मारहाणीचा अवलंब करायचा का? पण शिवसेनेकडे संयम आहे कुठे. खरेतर सत्ताधार्‍यांनी प्रकरणे शांत करायची असतात. परिस्थिती चिघळू नये यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न अपेक्षित असताना इथे उलटच चित्र दिसत आहे. शिवसेना नेते तथा ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही शिवसैनिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती म्हणत मारहाणीचे निर्ल्लजपणे समर्थन केले आहे. यातूनच त्यांची मानसिकता स्पष्ट होते. त्यांच्याकडून काय वेगळ्या अपेक्षा करणार? राज्यापुढे कोरोना, अतिवृष्टी-पूर, मराठा आरक्षण स्थगिती अशी अनेक आव्हाने आहेत. त्यांच्यावर मार्ग काढण्यासाठी, उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारने काम करणे अपेक्षित असताना यांचे भलतेच प्रताप सुरू आहेत. आपले अपयश झाकण्यासाठी तर ही मंडळी असले उद्योग करीत नाही ना, अशीही शंका येते. काहीही असो, यामध्ये त्यांची नाचक्की होतेय एवढे मात्र नक्की!

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply